अज्ञात समाजकंटकाने लावली शेतातील सोयाबीनच्या ढिगाला आग; माहूर तालुक्यातील हिंगणी येथील घटना.

घटनेचा छडा लावण्याचे माहूर पोलिसांपुढे आव्हान.!

346

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

  • यापूर्वीही खरीप, रब्बी हंगामात विविध शेतकऱ्यांचे असेच केले नुकसान.
  • गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करणे गरजेचे.

गत पाच वर्षापासून विविध अस्मानी व सुलतानी संकटांशी झुंज देत शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडलेला असतांना मौजे हिंगणी येथील एका अज्ञात समाजकंटकाने शेतकऱ्यांच्या शेतातील कापणी करून मळणीसाठी सुरक्षित जागी जमा करून ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगाला आग लावून संपूर्ण ढीग जाळून नुकसान केल्याची घटना नुकतीच तालुक्यातील हिंगणी येथे घडली आहे. पिडीत शेतकरी अविनाश गोविंदराव हुलकाने यांनी माहूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात समाजकंटकाविरुद्ध तक्रार दाखल केली असून सदर घटनेचा छडा लावण्याचे पोलीसासमोर आव्हान उभे ठाकले आहे.

माहूर तालुक्यातील मौजे हिंगणी येथील शेतकरी अविनाश गोविंदराव हुलकाने यांनी मौजे हिंगणी शिवारातील त्यांच्या शेत गट क्र.४६ मध्ये काढणीस आलेले सोयाबीन दि.१३ रोजी कापणी करून शेतातील सुरक्षित ठिकाणी ढीग लाऊन ठेवला होता. १४ रोजी मळणीयंत्र येणार असल्याने कापणी केलेले सोयाबीन शेतात झाकून ठेवून गावात गेले गावात कीर्तन असल्याने ते रात्री १० ते १२ कीर्तन ऐकण्यास गेले. कीर्तन संपल्यानंतर शेताकडून धूर येत असल्याचे दिसू लागल्याने त्यांनी शेताकडे धाव घेतली असता कापणी करून ठेवलेला सोयाबीन चा ढीग पेटला असल्याचे त्यांना दिसून आले. विशेष बाब म्हणजे सदर ढिगाच्या आसपास कुठेही विद्युत पुरवठा खांब किंवा कोणतेही ज्वलनशील वस्तू नसतांना सुद्धा सदर आग लागली असल्याने कुण्यातरी अज्ञात समाजकंटकाने जाणीवपूर्वक सोयाबीनचा ढीग जाळल्याची बाब लक्षात आली. या आगीच्या भक्ष्यस्थानी अंदाजे ३० ते ४० क्विंटल सोयाबीनचे उत्पादन सापडल्याने शेतकऱ्यांचे २ ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.

मौजे हिंगणी येथे यापूर्वीही ऐन खरीप व रब्बी हंगाम काढणीच्या वेळी अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे नुकसान केल्याच्या घटना घडल्या असल्याचा पुर्व इतिहास असून तत्कालीन पोलीस प्रशासनाने त्यावेळी प्रकरणे गांभीर्याने हाताळली नसल्याने सदर अज्ञात समाजकंटकाची हिम्मत वाढल्याने सदर घटनाची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याचे मौजे हिंगणी येथील शांतता व सुव्यवस्था प्रेमी नागरीकातून बोलल्या जात आहे. सदर प्रकरणात तरी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव पोलीस निरीक्षक नामदेव रिठे, स.पो.नि. अण्णासाहेब पवार, संजय पवार यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेऊन सदर प्रकरणाचा छडा लावून अज्ञात समाजकंटकाच्या मुसक्या आवळने गरजेचे आहे. शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा हा प्रश्न असल्याने सदर घटनेस महत्व देऊन गुप्तचर यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.