अर्धापुरातील येळेगावात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

2,920
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यातील येळेगाव कारखाना रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक बसली. ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना आज दि.१४ रोजी मंगळवारी दुपारी घडली आहे. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
येळेगाव ते कारखाना मार्गे दोन ट्रॉली एकमेकांना जोडून ट्रॅक्टर मार्फत ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्र.एम.एच.२६ बि.सी.६५१८ कारखान्याकडे जात होता. रंगनाथ बळीराम जाधव, वय ५४ वर्षे रा.असर्जन ता. जि. नांदेड हे देगाव ते येळेगाव मार्गे(येळेगाव येथील मुलीस भेटण्यासाठी ) येत असतांना पाणी फिल्टर जवळ रंगनाथ यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक बसली, यामध्ये रंगनाथ जाधव हे दुचाकीवरून खाली पडून ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक कपील आगलावे,जमादार बालाजी तोरणे व ईश्वर लांडगे यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केले. रंगनाथ जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. तेअर्धापूर पंचायत समितीचे उपसभापती अशोक कपाटे यांचे सासरे होते.
दोन ट्रॉली एकमेकांना जोडून ऊस वाहतुकीचे प्रकार वाढले आहे. यामधूनच हा अपघात घडला. ऊसाची अशी वाहतूक करणाऱ्या साधनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. जास्तीच्या ऊस वाहतूक करणाऱ्या अशा ट्रक व ट्रॉली यांच्यावर नियंत्रण आणण्याची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी असी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष कपाटे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.