अर्धापूर तालुक्यातील अमराबाद शिवारात विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे दि.२५ गुरूवारी रोजी दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत अमराबाद शिवारातील शेतकऱ्यांचे जवळपास १२ लाख ५० हजार रुपयाचे ऊसाचे पीक व ठिबक सह साहित्य जळाले. या आगीत शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले, भडकलेली आग ऊसाचे नुकसान करूनच थांबली.
अर्धापूर तालुक्यात अमराबाद शिवारातील विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या पिकांस आग लागली.आगीने ऊसाला वेढा घातला आणि पाहता पाहता आगीने रौद्र स्वरूप धारण केले. आगीच्या ज्वाला एवढ्या मोठ्या होत्या की, दुरवर अंतरावरून ही आग दिसत होती,अशी माहिती नुकसानग्रस्त शेतकरी यांनी दिली आहे. अर्धापूर तालुक्यातील अमराबाद शिवारातील शेतकरी मारोतराव यादोजी टेकाळे यांचा गट नं. १२८ मध्ये ३ एकर क्षेत्रात ऊस असून, ऊस व ठिबक असे एकूण ६ लाख ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे व जयश्री बाबासाहेब कदम गट नं. १२८ मध्ये १ हेक्टर ११ आर क्षेत्रात ऊस असून ऊस व ठिबक असे ६ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
ऊसाच्या पिकांना आगीने वेढले व काही वेळातच एक-एक एकर ऊस भस्मसात करीत आग पुढे सरकत गेली. दोन्ही शेतकऱ्यांचे १२ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने सदर नुकसानीची भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. सदर ऊस जळीत प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मित ऊस जळती प्रकरणी नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि बालाजी कोकरे, संदीप पाटील हे तपास करीत आहेत.