अर्धापूर तालुक्यातील निराधारांना अनुदान न मिळाल्यास प्रहार फटाके फोडून करणार आंदोलन – छगन पाटील सांगोळे.

दिवाळीपूर्वी अनुदान वाटप करण्याची मागणी.

420

सखाराम क्षीरसागर

अर्धापूर, नांदेड –

संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान मागील काही महिन्यांपासून न मिळाल्याने निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबीय दिवाळीच्या तोंडावर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे संबंधित अनुदान तत्काळ जमा करावे, अशी मागणी होत आहे.

निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्‍यक आहे. जेणे करून त्या पैशाचा उपयोग औषधी खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येईल.निराधारांना अनुदान देण्यासाठी श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना आदी योजनेतून अपंग, विधवा व निराधार वृद्ध लाभार्थी यांना विविध योजनेतून शासनाच्या वतीने मासिक अनुदान दिले जाते.मात्र गेल्या काही महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही.तर अनेक लाभार्थ्यांचे मानधन मिळणे बंदच झाले आहे.

मानधनाची रक्कम सरळ बँक खात्यात जमा होत असल्याने निराधार नागरिक सर्वप्रथम बँकेत जाऊन अनुदानाविषयी विचारणा करीत आहेत.मात्र,अनुदानच जमा न झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. काही नागरिक तहसील कार्यालयातही विचारणा करीत आहेत. शासनाकडून अनुदान न मिळाल्याने बँकेत जमा करण्यात आले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्यामुळे लाभार्थ्यांना बँक व कार्यालयाला खेटे मारावे लागतात. गेल्या काही महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे संबंधितांना तात्काळ मानधन जमा करावे अन्यथा सर्व लाभार्थ्यांना घेऊन प्रहारच्या स्टाईलने फटाके फोडून आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष छगन पाटील सांगोळे यांनी अर्धापूर तहसीलदार उज्वला पांगरकर यांना दिले.

निराधार व्यक्तींचे प्रलंबित मानधन दिवाळी अगोदर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे अन्यथा प्रहार संघटनेच्या स्टाईल मध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

– छगन सांगोळे, प्रहार जनशक्ती पक्ष
 तालुका अध्यक्ष अर्धापूर.

 

अपंग असल्याने कोणतेही काम करता येत नाही त्यात चार महिन्यात १ महिन्याचे मानधन मिळाले बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

  दिगांबर अबादार,
संजय गांधी निराधार लाभार्थी.

Leave A Reply

Your email address will not be published.