अर्धापूर नगरपंचायतींच्या ४ जागेसाठी २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

वार्ड क्र.१६ मध्ये सर्वाधिक १३ उमेदवार मैदानात

666
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर नगरपंचायतींच्या ४ जागांसाठी १८ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने ४ वार्डाची निवडणूक मोठ्या चुरशीची होणार असून उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. तर नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी २५ उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत. निवडणूक होत असलेल्या वार्डातील मतदारांची पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे.
अर्धापूर नगरपंचायतींच्या ४ जागा निवडून आणण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून वाटेल ते करा पण या चार जागा जिंका असा संदेश खास दूता मार्फत देण्यात आला आहे. वार्ड क्र.१ मध्ये भाजपाच्या गयाबाई भिसे, तर काँग्रेसच्या सौ.शालीनी व्यंकटेश शेटे, वंचितच्या सखुबाई शिनगारे अशी चौंरगी लढत होईल असे राजकीय विश्लेषकाडून भाकीत व्यक्त केले जात आहे. तर वार्ड क्र.७ मध्ये काँग्रेसचे पुंडलिक कानोडे, भाजपा सौ. लक्ष्मीबाई रामजी साखरे, तर शिवसेनेचे ओमप्रकाश नागलमे, अपक्ष ओमप्रकाश पत्रे अशी चौरंगी लढत होत आहे. तसेच वार्ड क्र.९ मध्ये भाजपाच्या सौ.अनुराधा माधवराव माटे, तर काँग्रेसच्या सौ.मिनाक्षी व्यंकटी राऊत, एमआयएमच्या सौ.गिता सुनिल खंडागळे, राष्ट्रवादीच्या नवले रूख्मीणबाई अशी लढत होत आहे. तसेच वार्ड क्र.१६ मध्ये काँग्रेसचे सलिम कुरेशी, भाजपाच्या चंद्रकला घूले, एमआयएमच्या शमिम बेगम गु.हक्कानी, अपक्ष संदेश कंधारे, अब्दुल शाकीर, राजू छापेवार यांच्यासह १३ उमेदवार रिंगणात आहेत.
अशी बहुरंगी लढत होणार असल्याने या वार्डत सर्वांत जास्त उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. एकूण २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार उज्वला पांगरकर, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, नगर विकास अभियंता नागनाथ देशमुख, ऑपरेटर विजय गंधनवाड, गिरीश गलांडे आदींनी सहकार्य केले. पहिल्या टप्प्यातील नगरपंचायत निवडणूका अटीतटीच्या झाल्यामुळे अनेक उमेदवारांनी देव पाण्यात सोडले असल्याची जोरदार चर्चा गुलाबी थंडीत होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.