‘एसजीजीएस’ संस्थेचे प्रा.डॉ.तलबार यांना ‘एआयसीटीई’ चा राष्ट्रीय ‘बेस्ट टिचर’ अवार्ड.

983

नांदेड-

नांदेडच्या विष्णूपुरी येथील ‘एसजीजीएस’ अर्थातच श्री गुरू गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील प्रा. डॉ. संजय तलबार यांना नवी दिल्ली येथील ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)च्या वतीने विश्वेश्वरय्या ‘बेस्ट’ टीचर्स अवार्ड या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

विष्णूपुरी नांदेड येथील ‘एसजीजीएस’ अर्थातच श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील जेष्ठ प्रा. डॉ.संजय निलकंठ तलबार यांना ‘एआयसीटीई’ नवी दिल्लीच्या वतीने २०२१ या शैक्षणिक वर्षात देण्यात येणारा ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टिचर अवार्ड’ हा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. दरम्यान शिक्षक दिनी म्हणजे ५ सप्टेंबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथे धर्मेंद्र प्रधान (शिक्षण मंत्री), राज्याचे राज्यमंत्री राजकुमार रंजनसिंह व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. ए.डी.सहस्त्रबुद्धे आदींच्या हस्ते प्राध्यापक डॉ. संजय तलबार यांना उपरोल्लेखित राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली आणि ‘एआयसीटीई’च्या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.डॉ. संजय तलबार हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असून गेल्या ३४ वर्षापासून ते ‘एसजीजीएस’ अभियांत्रिकी संस्थेतील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात सेवा देत आहेत.
विशेष बाब म्हणजे,अध्यापना व्यतिरिक्त त्यांनी विभाग प्रमुख, अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण, सेंटर ऑफ एक्सैलेन्स संयोजक आणि प्रबंधक तसेच संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळलेल्या आहेत.

प्रा. डॉ. तलबार यांना आजपर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय शैक्षणिक वर्षे २००३ चा ‘यूआरएसआय’ बेल्जियमचा यंग सायंटिस्ट पुरस्कार तसेच २०१८ या शैक्षणिक वर्षाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे संशोधनात्मक निबंध देश- विदेशातील अग्रगण्य प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले असून, प्रस्तुत संस्थेच्या आर्थिक विकासात लाखो रूपयांचा निधी भारत सरकारच्या विविध संस्थाच्या माध्यमातून त्यांनी मिळवून दिलेला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध विषयावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत २४ संशोधकांनी पीएच.डी.प्राप्त केली असून सध्या ६ विद्यार्थी संशोधन करीत आहेत.

प्रा. डॉ. संजय तलबार यांच्या यशाबद्दल संस्थेचे संचालक प्रा. डॉ. यशवंत जोशी यांच्यासह संस्थेतील अधिष्ठाता, विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी त्यांचे अभिनंदन करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.