कर्ज व सतत नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.
नायगाव, नांदेड –
बँकेचे कर्ज व अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाल्याने या नैराश्याला कंटाळून पाटोदा त.ब. येथील शेतकरी अंबादास दिगांबर शिंदे (५५) यांनी गळफास घेवून शनिवारी पहाटे आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत संदीप शिंदे यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात आत्महत्येची फिर्याद दिली. या प्रकरणी गावात मात्र वेगळीच चर्चा सुरु आहे.
निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी देशोधडीला लागत असून अतिवृष्टी आणि गोदावरी नदीच्या बॅक वाटरच्या पाण्याचा फटका बरबडा भागातील शेतीला बसला असून पाटोदा त.ब. हे गाव बरबडा जिल्हा परिषद गटात येते. पाटोदा येथे मयत शेतकरी अंबादास शिंदे यांची शेती असून त्यांना दोन मुलं व एक मुलगी आहे. मात्र मागच्या महिन्यातील अतिवृष्टीचा फटका शेतीला बसला असून त्यातच बँकेचे कर्ज डोक्यावर आहे.अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाल्याने अंबादास शिंदे खचून निराश झाले होते त्यातच कर्ज कसे फेडावे या नैराश्याने ते चिंतेत होते. त्यामुळे पाटोदा शिवारातील त्यांच्या शेताच्या धुऱ्यावरील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. सदरची घटना आज दि. १६ रोजी शनिवारी पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान घडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. सदर प्रकरणी कुंटूर पोलिसांनी घटनास्थळी जावून रितसर पंचनामा केला आहे.
शेतकरी अंबादास दिगांबर शिंदे (५५) यांनी पुराच्या पाण्याने शेतीचे नुकसान झाले असल्याने या नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयत शेतकऱ्याचा मुलगा संदीप शिंदे (३२) यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात दिली आहे. दिलेल्या तक्रारीवरुन कुंटूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती कुंटूर पोलिसांनी दिली आहे.