किनवट ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या चिंचोली तांडाच्या डांबरीकरण रस्त्यासाठी खा. हेमंत पाटील यांचे निधी देण्याचे आश्वासन.

230

किनवट/नांदेड-

किनवट ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या चिंचोलीतांडा ते मुख्य मार्ग या 2 कि.मी अंतराच्या डांबरीकरण रस्त्यासाठी त्वरित भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार हेमंत पाटील यांनी दिल्यामुळे मागील कित्येक वर्षापासून खराब रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या चिंचोली तांडा येथील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे.

किनवट ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील बोधडी बुद्रुक जवळील मौजे चिंचोली तांडा हे गाव अतिशय मागास व दुर्गम असून बोधडीजवळ मुख्य मार्गापासून चिंचोलीतांडा गावाकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता उपलब्ध आहे मात्र खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. चिंचोली तांडावासीयांना नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे अतिशय धोकादायक बनले असून मागील कित्येक वर्षापासून या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून संपूर्ण गिट्टी उखडून गेल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गावातील आजारी व्यक्ती तसेच गरोदर महिलांना वाहनातून प्रवास करताना प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत.पावसाळ्याच्या दिवसात तर खड्ड्यामध्ये पाणी साचून कित्येक वेळा वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत या रस्त्याचे डांबरीकरण करावे यासाठी चिंचोली तांडावासीय अनेक वर्षापासून प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करून पाठपुरावा करत आहे परंतु प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. दरम्यान हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील हे बुधवारी किनवट दौऱ्यावर येत असल्याचे समजताच युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोरडे यांच्या पुढाकारातून चिंचोली तांड्याच्या शेकडो नागरिकांनी बुधवारी येथील शासकीय विश्रामगृहात खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतली यावेळी प्रशांत कोरडे यांनी चिंचोलीतांडा ते मुख्यमार्गाला जोडणाऱ्या दोन किमी अंतराच्या रस्त्याची दुरावस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच गावकऱ्यांनी मागणीचे निवेदन खासदार पाटील यांना दिले.या निवेदनाची दखल घेत रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी नागरिकांना दिल्यामुळे खराब रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

याप्रसंगी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोरडे चिंचोली तांडाचे पोलीस पाटील पंडित राठोड, श्यामराव चव्हाण नाईक, माजी सरपंच आनंदराव चव्हाण, कारभारी केशव चव्हाण, दयाराम चव्हाण, नामदेव चव्हाण, दुधराम चव्हाण, उकंडराव चव्हाण, विठ्ठल चव्हाण, गोकुळ चव्हाण, मनोहर राठोड, संतोष राठोड, गुलाब चव्हाण यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.