कोरोनाचे संकट नांदेड जिल्ह्यातून होतेय हद्दपार, 1604 पैकी 1450 खेडेवस्ती कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हा उद्रेक अधिक पाहायला मिळाला. शहरातून कोरोना ग्रामीण भागात पोहोचला. गाव, खेडेवस्तीत कोरोना हातपाय पसरु लागला. त्यामुळे चिंता अधिक वाढली. कोरोनाच्या तावडीतून ग्रामीण भागही सुटला नाही. या कोरोनाला दूर ठेवण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरु केली. कडक निर्बंध लादले. त्यानंतर हळहळू कोरोना कमी होत आहे. ‘गाव कोरोना मुक्त करा आणि 50 लाख जिंका’, असे नवी घोषणा आता सरकारला करावी लागली आहे. याचा सकारात्मक प्रभाव पडताना दिसत आहे. काही गावे आधीपासून खबरदारी घेत आहे. आता तर नांदेड जिल्ह्यातील 1604 खेडे गावांपैकी 1450 खेडी कोरोनामुक्त झाली आहेत. (Out of 1604 villages, 1450 villages Corona free in Nanded)
कोरोना पोहोचलेल्या खेड्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दक्षतेने पेलून जिल्ह्यातील 1 हजार 450 खेड्यांना कोरोनाला हद्दपार करण्यासाठी बळ दिले. यात ग्रामपंचायतींचे, पंचायती समित्यांचे आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी परस्पर सहकार्यातून कोरोनाच्या त्रीसुत्रीचा गावपातळीवर अंमल व्हावा यासाठी भरीव योगदान देण्यात आले.
यांचा मोठा सहभाग
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागातील अंगणवाडी सेविकेपासून ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंतची सर्व यंत्रणा पूर्ण सक्षमतेने कार्यरत राहिल्यामुळे जिल्ह्याला हे यश साध्य करता आले. कोरोनाचे आव्हान अजून संपले नसून खेड्यातील लोकांसह ग्रामपंचायतींनी गाफिल न राहता अधिक जबाबदारीने यापुढे दक्षता घेतली तर नांदेड जिल्हा हा कोरोनामुक्तीच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण जिल्हा असेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.