कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून श्री गणेशोत्सव शांततेत पार पाडावा- अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोरे यांचे आवाहन.

547

नवीन नांदेड-
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत सर्वांनी सद्यस्थितीमधील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गणेशोत्सव शांततेत साजरा करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी केले.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी पोळा तसेच श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार सप्टेंबर रोजी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची स्नेह बैठक तथा शांतता समितीची बैठक घेण्यात आली.या बैठकीला उपस्थित सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,विविध राजकीय पक्षाचे तसेच श्री गणेश मंडळांचे सर्व पदाधिकारी यांच्यासह पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, ग्राम पंचायत सदस्य, आजी-माजी सरपंच आणि उपसरपंच आदी लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे व प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची उपस्थिती होती.

निलेश मोरे पुढे बोलताना म्हणाले, राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्वांनी सद्यपरिस्थितीतील गांभीर्य ओळखून व आरोग्य सांभाळून पोळा आणि गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने तसेच शांततेत साजरा करावा. याशिवाय आगामी पोळा सण तसेच श्री क्षगणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत व गणेशोत्सवालाही गालबोट लागणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. तुम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, म्हणजे प्रशासन तुम्हाला योग्य सहकार्य करेल, असे सांगून गणेशोत्सवात ‘गैर’ प्रकार करणाऱ्या लोकांची कुठलीही गय केली जाणार नाही, असे सांगितले. विशेष बाब म्हणजे, ‘कोरोना’चा समूळ नायनाट करण्याकरिता आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागणार असल्याचे स्पष्ट सांगून गणेशोत्सव काळात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘कोरोना’ लसीकरण, रक्तदान शिबिर आदी समाजोपयोगी कार्यक्रम घेवून जिल्हास्तरावरील पारितोषिक मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांनी, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गर्दी होईल अशा कुठल्याही देखाव्यांचे सादरीकरण करू नये,असे सांगून गर्दी टाळून गणेशोत्सव शांततेत साजरा करावा. त्याचवेळी, ‘डीजे’ वगैरे न वाजवता आणि वाजत-गाजत मिरवणुका न काढता साधेपणाने पूजा-अर्चा तसेच आरती वगैरे धार्मिक कार्यक्रम घेवून धार्मिक पावित्र्य जपावे, असे आवाहन केले.याशिवाय गणेशमूर्ती चार फुटापेक्षा मोठी नसावी, असे स्पष्टपणे सांगून शासनाच्या नियम-अटींचे पालन करून गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव कालावधीत आपल्याकडून कुठलाही गैरप्रकार होणार नाही अथवा राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही,याबद्दल योग्य ती खबरदारी घेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. तर
पो.नि.अशोक घोरबांड यांनी आपल्या प्रास्ताविकात सद्यस्थितीत गर्दी टाळून समाजोपयोगी कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचे आवर्जून सांगून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये रक्तदान शिबीर व कोरोना लसीकरण मोहीम आदी समाजोपयोगी कार्यक्रम घेवून सामाजिक तथा राष्ट्रीय कार्याकरिता सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन याप्रसंगी केले.
या बैठकीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेडचे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, बापूसाहेब पाटील, गजानन चंदेल,तसेच महिला पोलीस पाटील सुमन खोसडे आदींनी आपल्या मनोगतातून गणेशोत्सवात उदभवणाऱ्या संभाव्य समस्यांवर संबंधित प्रशासनाच्या वतीने योग्य उपाय-योजना करण्याची सूचना वजा मागणी केली.

याप्रसंगी पोलीस पाटील खंडेराव बकाल व त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, डीवायएसपी.डॉ. सिध्देश्वर भोरे व पो.नि.अशोक घोरबांड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे. या बैठकीला सतिश कासेवार, विनोद जाधव, बजरंग ठाकूर, विनायक मोरे, अजमोद्दीन शेख, रंगराव संगेकर, प्रकाश घोरपडे, सुमन खोसडे, पत्रकार रमेश ठाकूर, शिवाजी राजूरकर, दिगंबर शिंदे तसेच संभाजी सोनकांबळे यांच्यासह नवीन नांदेडातील विविध गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन दिगांबर शिंदे यांनी, तर नूतन सहाय्यक पो.नि.संकेत दिघे यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीच्या यशस्वीतेकरिता विशेष शाखेचे पोलीस नाईक संजय जाधव, तानाजी चाटे, महिला पोलीस नाईक संगिता गुरूपवार, म.पो.कॉ. वैशाली घोनशेटवाड व त्यांचे सर्व सहकारी पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.