गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळानी कोविड लसीकरण कॅम्पचे आयोजन करून लसीकरणास सहकार्य करावे. – तहसीलदार वरणगावकर.
जयकुमार अडकीने
माहूर, नांदेड –
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी प्रशासनातर्फे सुरु असलेल्या लसीकरण मोहिमे अंतर्गत सामाजिक बांधिलकी म्हणून गणेश मंडळांनी लसीकरण कॅम्पचे आयोजन करून प्रशासनाच्या मोहिमेत सक्रीय व्हावे, असे आवाहन तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दि. ११ सप्टेंबर रोजी माहूर पोलीस स्टेशन येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस स.पो.नि.अण्णासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साहेबराव भिसे, माहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित अंबेकर पो.उपनि. विठ्ठलराव जाधव, पो.हे.कॉ.खामनकर, यांची उपस्थिती होती.
कोरोना महामारीच्या काळात संपन्न होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त प्रशासनाकडून नवे काही निर्देश देण्यात आले.त्या अनुषंगाने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले. नवीन निर्देशांमध्ये गणेश मंडळातर्फे महाप्रसाद कार्यक्रम आयोजन करण्यास मनाई करण्यात आली असून त्याऐवजी महाप्रसाद जागेवर तयार करून पार्सल देण्यास मुभा देण्यात आली आहे. तर विसर्जन मिरवणुकीस निर्बंध असून विसर्जनच्या दिनी पूजा अर्चा करून नगरपंचायत प्रशासनाकडे विसर्जनासाठी ताब्यात द्यावयाचे आहेत. अशा सूचना उपस्थित गणेश मंडळ पदाधिकारी यांना देण्यात आल्या.याशिवाय गणेश मंडळानी कोविड लसीकरण कॅम्पचे आयोजन करणे प्रशासनाकडून सक्तीचे केले असल्याचे सांगून याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेची गणेश मंडळांना प्राप्त झालेली ही एक संधी असून या संधीचा लाभ घेत गणेश मंडळांनी लसीकरण न झालेल्या जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी म.न.से तालुकाध्यक्ष विनोद पाटील सुर्यवंशी, प्रमोद राठोड, लालू दुधे, रफिक भाई, केशव जाधव, पो,कॉ.साहेबराव सगरोळीकर, पो.कॉ.गजानन इंगळे, पो.कॉ.प्रकाश देशमुख, आदीसह माहूर शहरातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.