चेन्नईची हैदराबाद वर 6 गड्यांनी मात, मोक्याच्या क्षणी धोनीचा ‘सिक्सर’..

523

शारजा –

आज आयपीएलमध्ये चेन्नई संघासमोर हैदराबादचे आव्हान होते. या सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर चेन्नईने हैदराबादचा 6 गड्यांनी धुव्वा उडवत विजयासह गुणतालिकेत 18 अंकासह प्ले ऑफ मधील आपले स्थान निश्चित केले आहे. आयपीएल 2021 मध्ये प्ले ऑफ गाठणारा चेन्नई हा पहिलाच संघ ठरला आहे.

दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वपूर्ण होता. 4 षटकात केवळ 24 धावा देऊन महत्वाचे तीन गडी बाद करणारा चेन्नईचा जलदगती गोलंदाज हेजलवूड सामनावीर ठरला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता व चेन्नईच्या गोलंदाजांनीही कर्णधाराला निराश केले नाही.

वृद्धिमान साहा 44 धावा वगळता हैदराबादचा एकही फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही.त्यामुळे हैदराबाद संघ 20 षटकात मात्र 134 धावाच करू शकला तर चेन्नई कडून हेजलवूड ने 3 तर ब्रावोने 2 गडी बाद केले. कमी धावांचा पाठलाग करीत असताना चेन्नईच्या सलामीवीरांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. 75 धावाच्या धावसंख्येवर चांगल्या फॉर्मात असलेला महाराष्ट्राचा सलामीवीर फलंदाज गायकवाड 45 धावांवर बाद झाला.तर ड्युपलेसीस ने 41 धावांचे योगदान दिले. हैदराबाद कडून होल्डरने 3 गडी बाद केले. शेवटच्या तीन चेंडूवर दोन धावांची गरज असताना धोनीने विजयी षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह प्ले ऑफ मध्ये प्रवेश करणारा चेन्नई पहिला संघ ठरला आहे तर दुसरीकडे हैदराबाद संघाचा पराभवाने आव्हान संपुष्टात आलं आहे.

मोक्याच्या क्षणी धोनीचा ‘सिक्सर’ ठोकत फिनिशिंग टच…

सामना बॉल टू रन आल्यानंतर धोनी आणि रायडू क्रिजवर होते. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांची टिच्चून मारा करत धावा आणि चेंडूतील अंतर वाढवण्यास सुरुवात केली. अखेरची तीन षटके राहिली असताना रायडूने मोठे फटके मारण्यास सुरुवात केली शेवटी त्याने सामना 12 चेंडूत 16 धावा असा आणला.19 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या भुवनेश्वरला दुसऱ्याच चेंडूवर रायडूने षटकार मारला.त्याच षटकात धोनीनेही चौकार मारत सामना आपल्या आवाक्यात आणला. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी हार न मानता टिच्चून मारा करत सामना 3 चेंडूत 2 धावा असा आणला असता धोनीने आपल्या जुन्या स्टाईलमध्ये षटकार खेचत सामना फिनिश केला. धोनीने 11 चेंडूत नाबाद 14 धावा केल्या. यात एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता. तर रायडूने 13 चेंडूत 17 धावांची खेळी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.