चेन्नईने लुटले विजयाचे सोने; धोनीच ठरला किंग, CSK चौथ्यांदा IPL- चॅम्पियन.
दुबई –
फाफ डुप्लेसिसचे दमदार अर्धशतक, शार्दुल ठाकूरची भेदक गोलंदाजी व रवींद्र जडेजाची क्षेत्ररक्षणा सोबतचं महत्त्वपूर्ण गोलंदाजी यामुळे चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत आयपीएलचे चौथे विजेतेपद आपल्या नावावर केले.
दुबईच्या मैदानावर रंगलेल्या महामुकाबल्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने अनुभवाचा योग्य तो वापर करत महत्त्वाच्या क्षणी सामना आपल्या बाजूने फिरवला. नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता समोर २० षटकात ३ बाद १९२ धावा केल्या. सलामीवीर फाफ डुप्लेसिसने तडाखेबंद ८६ धावांची खेळी केली. त्याला ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा आणि मोईन अलीची मोलाची साथ मिळाली.
प्रत्युत्तरात कोलकाताचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी ९१ धावांची दमदार सलामी दिली. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी घेतलेल्या दबावामुळे कोलकाता आपल्या तिसऱ्या जेतेपदापासून दूर राहिली. त्यांना २० षटकात ९ बाद १६५ धावांपर्यंतच मजल मारता आली.
ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस यांनी चेन्नईसाठी चांगली सलामी दिली. कोलकाताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला डुप्लेसिसला तिसऱ्या षटकात यष्टीचीत करण्याची संधी असताना त्याने ती गमावली. डुप्लेसिसने या जीवदानाचा फायदा उचलला. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये चेन्नईचे अर्धशतक फलकावर लावले.
नवव्या षटकात फिरकीपटू सुनील नरिनने कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. त्याने ऋतुराज गायकवाडला वैयक्तिक ३२ धावांवर झेलबाद केले. ऋतुराजनंतर रॉबिन उथप्पाने फटकेबाजी केली. ११व्या षटकात डुप्लेसिनने वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला षटकार ठोकत आपले पाचवे अर्धशतक फलकावर लावले. आक्रमक उथप्पाला सुनील नरिनने पायचित केले, उथप्पाने १५ चेंडूत ३ षटकारांसह ३१ धावा केल्या. उथप्पानंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने चांगलीच फटकेबाजी केली. डुप्लेसिसने आधी उथप्पासोबत त्यानंतर मोईन अलीसोबत अर्धशतकी भागीदारी उभारली. २० व्या षटकात मावीने फक्त ७ धावा दिल्याने चेन्नईला दोनशे धावाच्या आत रोखता आले. शेवटच्या चेंडूवर डुप्लेसिस झेलबाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८६ धावा केल्या. तर मोईन अली २ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावांवर नाबाद राहिला. २० षटकात चेन्नईने ३ बाद १९२ धावा फलकावर लावल्या.