जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची संयुक्त कारवाई ; १७ हजार लिटर बायोडिझेल केले जप्त

975
नांदेड –
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर व पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे विनापरवाना विक्रीसाठी साठविण्यात आलेले सुमारे १७ हजार लिटर बायोडिझेलसह तब्बल १४ ते १५ लांखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही संयुक्त कारवाई २० डिसेंबर रोजी नांदेड शहराशेजारी असलेल्या धनेगाव शिवारातील गोदामात करण्यात आली आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना नांदेड शहरालगत धनेगाव शिवारातील बाळगीर पंचमगीर मठाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी एका इमारतीत विनापरवाना व अवैधरित्या बायो- डिझेलचा विक्री व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहीती समजली. उपरोक्त गोपनीय माहीती समजताच जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर तसेच पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी २० डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेदरम्यान, नांदेड ग्रामीण ठाण्याचे प्रभारी पो.नि.अशोक घोरबांड, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार दीपक मरळे तसेच तलाठी प्रदीप उबाळे पाटील, तलाठी मंगेश वांगीकर व त्यांचे अन्य सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह धनेगाव भागातील घटनास्थळी धाड टाकली. धाडीदरम्यान, घटनास्थळावर एका गोदामात ४ ते ५ प्लॅस्टिकच्या टाकीत बायोडिझेलचा विना- परवाना साठा करण्यात आला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्याचवेळी,घटनास्थळी तीन आरोपीही आढळुन आले आहेत. त्या ठिकाणी आढळून आलेल्या तीन तरूण आरोपींना नांदेड ग्रामीण पोलीसांकडून तात्काळ जेरबंद करण्यात आले असल्याचीही माहिती पो. नि. अशोक घोरबांड व सपोनि. संकेत दिघे यांनी दिली.

नांदेड ग्रामीण पोलीसांनी नांदेड शहराच्या शेजारील धनेगाव शिवारातील वरील घटना स्थळावरून ताब्यात घेतलेल्या तीन आरोपीं-मध्ये उमर शकील खुरेशी (वय-१८ वर्ष), समीर हबीब कुरेशी (वय-१८वर्ष, रा.संजयनगर, औरंगाबाद) व शेख अलीम शेख अब्दुल करीम (वय-३२ वर्ष, रा. वाजेगाव ता. जि. नांदेड) यांचा समावेश असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे, सोमवारी सायंकाळी उशीरा पर्यंत पोलीसांच्या आणि नांदेडच्या महसुल प्रशासनाच्या वतीने घटनास्थळ पंचनामा व घटनास्थळावरील सुमारे १७ हजार लिटर बायोडिझेल तसेच २० हजार लिटर्स क्षमतेच्या लोखंडी टँकसहीत बाराचाकी ट्रक ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरूच होती. घटनास्थळावरून पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार डी. पी. मरळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे, पोलीस नाईक ज्ञानोबा कवठेकर, प्रभाकर मलदोडे, शिवानंद कानगुले, सुदर्शन गजभारे, नारायण भांडवले, पो. कॉ. विश्वनाथ पवार व त्यांच्या अन्य सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने धनेगाव भागातील घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात येत असलेल्या मुद्देमालामध्ये प्लॅस्टिकच्या टाक्या, बायोडिझेलचे मोजमाप करणारी मशीन व विविध कंपन्यांचे विद्युत पंप तथा मोटारी आदींचा समावेश आहे.

याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधितांकडून रितसर तक्रार आली नाही. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तक्रार प्राप्त होताच या प्रकरणातील संबंधित सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे अंमलदार तथा सपोउपनि. ज्ञानोबा गिते यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.