नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथील रहिवासी तथा ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव भिमराव पाटील भिलवंडे यांचे दि.१६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दुःखद निधन झाले. ते ७० वर्षांच होते. त्यांच्या पार्थिवावर दि.१७ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी ११ वाजता नरसी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
भगवानराव पाटील भिलवंडे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना किडनीचा आजार झाला होता पण त्यांनी त्यावर मात केली होती.नरसी या गावाला व्यापारी, दळणवळण व्यवस्थेत अग्रगण्य करण्यात भगवानरावजी यांचे खुप मोठे योगदान आहे, त्यांनी नरसी बसस्थानकासाठी दिलेली विनामूल्य जागा म्हणजेच त्याच्यातील दानधर्म करण्याचा खुप मोठा गुण दिसून येतो, त्यांनी अनेक पदे भुषवली पण कधीही पदाचा गैरवापर केला नाही. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मंडळी भगवानराव यांच्या सानिध्यात आली. साधी राहणी व शुद्ध विचारधारा व चारित्र्यसंपन्न जिवन त्यांनी आत्मसात केले होते.
भगवानराव भिमराव पाटील भिलवंडे यांनी कै.शंकरराव चव्हाण, भास्करराव पाटील खतगावकर, अशोकराव चव्हाण यांच्यासोबत राजकारणात काम केले.गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन म्हणून अनेक वर्ष त्यांनी निःस्वार्थ काम केले तसेच महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणून साहित्यिक क्षेत्रातही त्यांनी काम करत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.शंकरनगर येथील गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव म्हणून त्यांनी काम केले, पंचायत समितीचे सदस्य, नरसी येथील तुळजाभवानी जिनिंगचे अध्यक्ष व दत्तात्रय संस्थेचे अध्यक्ष म्हणून पदे भुषविले.भगवानराव पाटील भिलवंडे हे एक दिलदार व मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्ती म्हणून ते परिचित होते.त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी,पत्नी,सुना नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नरसी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे यांचे ते वडील होत.