दरेकरांची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात पुन्हा तर्कवितर्कांना उधाण.

524

मुंबई.
कोल्हापूरातील नुकसानग्रस्त भागाच्या दौ-यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या गाठीभेटीनंतर राज्यात पुन्हा राजकीय तर्कवितर्काना उधाण आले आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेवून बंद दाराआड चर्चा केल्याचे समजते.

कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा कोल्हापूरात असल्याचे कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना भेटण्यासाठी निरोप पाठवला होता.त्यानंतर या दोघांची भेट झाली.या भेटीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काही तरी सांगितले.मात्र या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते समजू शकले नाही.गत आठवड्यात राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी दिल्लीवारी केली. यावेळी फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून चर्चा केली.भाजपच्या नेत्यांची दिल्लीवारी संपल्यानंतर आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली.

 

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील अनेक कुटुंब उध्दवस्त झाली आहेत.त्यांना उभारी मिळावी यासाठी मुंबईतील सहकार संस्थांच्यावतीने पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी दीड कोटीचा धनादेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला.हा कार्यक्रम संपताच दरेकर आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात सुमारे १५ ते २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते.देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय दरेकर आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीमुळे अनेक राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.