दोन जीवाच्या गरोदर विवाहितेने दीड वर्षाच्या पोटच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या.

एकाच वेळी तीन जीव गेल्याची घटना सहा दिवसानंतर उघडकीस.

1,284

नायगाव, नांदेड –

गडगा ता.नायगाव येथील गरोदर विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या कन्येसह 3 सप्टेंबर रोजी घरातून निघून जाऊन रागाच्या भरात आत्महत्या केल्याची घटना घडली असून एकाच वेळी तीन जीव गेले आहेत. सदर घटना तब्बल सहा दिवसानंतर 9 सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. गडगा शिवारातील एका शेतातील विहिरीत सदर महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगुन आल्याने सदर घटना ग्रामस्थांनी नायगाव पोलिसांना कळवली नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत सविस्तर असे की, गडगा ता.नायगाव येथील निळूबाई अंकुश बोईनवाड वय 25 वर्ष,ही विवाहित महिला 3 सप्टेंबर रोजी दुपारी शेजारच्या महिले सोबत वाद करून घरातून निघून गेली व जाताना दीड वर्षाची अक्षरा अंकुश बोईनवाड या स्वतःच्या मुलीसह निघून गेली. सदर महिला गरोदर होती असे कळले.सदर महिला रागीट स्वभावाची होती.या पूर्वी दोन तीन वेळा ती न सांगता निघून गेली होती. सासरच्या व माहेरच्या नातेवाईकांनी शोध घेतला परंतु यावेळी सापडली नाही.

दि.9 सप्टेंबर रोजी सायंकाळी गडगा गावाच्या पश्चिम बाजूला गडगा कौठा रोड पासून 200 मी अंतरावर असलेल्या सुलोचना आमलापुरे यांच्या शेतातील विहिरीत माय व लेकीचं प्रेत तरंगत असल्याची माहिती बिट जमादार वाघमारे यांना देण्यात आली. या माहितीनुसार नायगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, यांनी घटनास्थळी भेट दिली व पोलीस उपनिरीक्षक बाचावार, एएसआय. वाघमारे, जमादार शेख यांना पंचनामा करून घेण्याचे आदेश दिले. या नुसार नायगाव पोलिसांनी पंचनामा केला असता नातेवाईकांची तक्रार नसल्याने नायगाव ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरम बिटचे पोलीस जमादार शेख हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.