धर्माबादच्या येवती येथील जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांनी लिहले मुख्यमंत्र्यांना भावनिक आभार पत्र.
प्रदिर्घ काळानंतर सुरू झालेल्या शाळेने विद्यार्थ्यांत नवचैतन्य.
धर्माबाद, नांदेड –
कोरोना विषाणू प्रादुर्भाव संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मागील पंधरा महिन्यापासून ग्रामीण व शहरी शाळा बंद होत्या. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विशेष असा निर्णय घेऊन ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांच्या शाळा कोरोना नियमांचे पालन करून चालू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत करून धर्माबादच्या येवती येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी भावनिक आभार पत्र लिहून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक उपक्रमशील शिक्षक शिवकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कु.शिरिषा नागनाथ गोदामवार या विद्यार्थिनीने लिहिलेले हे भावनिक पत्र अत्यंत भावनिक व अभिनंदनीय असून त्यामध्ये ती लिहिते, “आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब 4 ऑक्टोबर 2021 पासून आमचा शारीरिक, बौद्धिक,मानसिक विकास योग्य गतीने व्हावा व आमचे शैक्षणिक भविष्य उज्वल व्हावे यासाठी आपल्या शासन आदेशानुसार ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्यात.”सर ही आम्हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे; मागील जवळपास पंधरा महिन्यापासून शाळा बंद होत्या परंतु आमच्या आदरणीय शिक्षक वृद्धांच्या नियोजनामुळे आमचे शिक्षण चालूच होते. परंतु सर प्रत्यक्ष शाळेत जाऊन ज्ञानार्जन करणे, आपल्या सवंगड्यांना भेटणे हे खूपच आनंददायी असते. सर आपणास वचन देतो की आम्ही शाळेत आवश्यक नियमांचे पालन करू.अशाप्रकारे कु.रोशनी बोईनवाड, धनश्री भोसले, आरती कोंकुलवार, फरीन अहमद, गायत्री इबितवार,वैष्णवी इरलोड, प्रेमलता सूर्यवंशी, पूजा जाधव, पल्लवी जायवाड या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना पत्रातून व्यक्त केल्या व माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.