धारुर तालुक्यातील भीषण कार अपघातात भोकरचे २ जण ठार, तर एक जखमी

1,834
गंगाधर पडवळे,
भोकर, नांदेड.

भोकर येथील तरुण काही कामानिमित्त जात असताना दि.16 जानेवारी रोजी धारुर तालुक्यातील तेलगाव जवळ बीड परळी महामार्गावर परळीकडून भरधाव वेगात स्विफ्ट डिझायर गाडीची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी तेलगाव येथे घडली.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील शेख युसूफ शेख शादुल, सचिन मोकमपल्ले व अमोल वाघमारे (सर्व राहणार शहिद प्रफुल्ल नगर, भोकर) हे तीन तरूण रविवारी एम. एच.१३ सीके ०४४१ या स्विफ्ट डिझायर गाडीने भोकर येथून तेलगावमार्गे बीडला निघाले होते. तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या अमर बिअर बारजवळ सदर गाडी आली असता चालकाचे स्टेरिंगवरील नियंञण सुटल्याने गाडी रोडालगत खड्ड्यात असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन धडकली. गाडी एवढ्या जोरात धडकली की, गाडी चक्काचूर झाली. या अपघातात चालक व चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेले तरूण शेख युसूफ शेख शादुल व सचिन मोकमपल्ले हे जागीच ठार झाले. तर मागच्या सिटवर बसलेला तरूण दोन्ही सिटमध्ये अडकला, तो जखमी आहे. मयत व जखमी भोकरचे आहेत. त्या तरूणांच्या मोबाईलच्या फोन वरून तरुणांची ओळख पटविल्याचे सांगण्यात येते.

गावालगतच अपघात झाल्याने अमर बिअर बारचे मालक कांता पाटील लगड हे इतर नागरिकांना घेऊन तात्काळ घटनास्थळी गेले. अपघात झाल्याचे समजताच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु ते बाहेर काढता येत नव्हते. त्यामुळे गॅस वेल्डिंगने वेल्डिंग करून, एका मयतास बाहेर काढले. तर जखमी व अन्य एका मयतास जेसीबीच्या साहाय्याने पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले.

मयत व जखमींना 108 रूग्ण वाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड तसेच जेसीबी (JCB) मालक मच्छिंद्र माने तसेच शेकडो नागरिकांनी माणुसकी दाखवत गाडीतील मयत व जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढत एका जखमी तरूणाचा जीव वाचवला.

Leave A Reply

Your email address will not be published.