नांदेडचे सुपुत्र रजत कुंडगिर यांचे ‘युपीएससी’ परीक्षेत सुयश.
नांदेड –
नांदेडचे सुपूत्र रजत नागोराव कुंडगिर ‘युपीएससी’ परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. रजत कुंडगिर यांचा अखिल भारतीय रँकिंगमध्ये ६०२ वा नंबर आला आहे. रजत कुंडगिर यांचे वडील एन. बी. कुंडगिर हे नांदेड येथे पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक असून, त्यांच्या आई शंकुतला नागोराव कुंडगिर या कृष्णूर येथील औद्योगिक वसाहतीतील एका सुप्रसिद्ध फ्लोअर मिलच्या उद्योजिका आहेत.
नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पटेलनगर, दिल्ली येथील ‘वाजीराम’ क्लासेसमध्ये रजत कुंडगिर यांनी गत दोन वर्षापासून आपला अभ्यास पूर्ण केला आहे. दुसऱ्या प्रयत्नात रजत कुंडगिर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादित केले असून, त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे नांदेड येथे सर्वत्र अभिनंदन होत आहे.