नांदेडमद्धे तरुणीचा विनयभंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल.
नांदेड-
एका २४ वर्षीय तरूणीचा विनयभंग करून तिला मारहाण करत जीवे मारण्याचीही धमकी दिल्याच्या आरोपावरून गाडेगाव (ता. नांदेड) येथील दोन आरोपींविरूध्द अखेर नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत असलेल्या गाडेगाव येथील एक तरूणी २८ ऑगस्ट रोजी सकाळी दहावाजेच्या सुमारास तिच्या घरासमोर उभी होती. दरम्यान गाडेगाव येथील आरोपी देविदास ईरबाजी उबाळे हा तेथे आला. त्याचवेळी, त्याने पिडित तरूणीला तु मला बोलत जा,असे म्हणून त्याच्याजवळील मोबाईल त्या तरूणीकडे फेकला. त्याचवेळी, ‘त्या’ तरूणीने त्याला मी तुला बोलणार नाही, तुझा व माझा काय संबंध आहे,असा जाब विचारताच आरोपी देवीदास याने तिचा हात धरून ओढून विनयभंग केला आहे.
आरोपी देवीदास उबाळे हा एवढयावरच थांबला नाही,तर त्याने ‘तु जर मला नाही बोललीस, तर तुझे जुने फोटो दाखवून तुझे लग्न होवू देत नाही’,असे म्हणाला. दरम्यान,पिडीत तरूणीने त्याचा मोबाईल त्याच्या घरासमोर फेकला आणि त्याच्या वडिलांना देविदासला समजावून सांगा असे म्हणाली असता, देवीदासचा लहान भाऊ संदीप उबाळे याने ‘तु माझ्या भावाची बदनामी करतेस का’, असे म्हणून शिवीगाळ करीत आपले केस धरले. त्याचवेळी, आरोपी देविदास उबाळे आणि संदीप उबाळे यांनी आपणास थापडबुक्यांनी मारहाण करून ढकलून दिले व पुन्हा तु आमची बदनामी केली, तर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकतो, म्हणून धमकी दिली आहे, असा आरोप पिडित तरूणीने दिलेल्या तक्रारीतच नमूद आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस पो.कॉ. जनार्धन महाले यांनी दिली आहे.
याप्रकरणी पिडीत तरूणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात उपरोक्त आरोपींविरूध्द अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बालाजी चंचलवाड याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.