नांदेड शहरातील मुरमुरा गल्लीत भरदिवसा ऐन लोकांच्या गर्दीत हमाल युवकाचा निर्घृण खून.

3,664
नांदेड –
नांदेड शहरातील मुरमुरा गल्लीत एका 30 वर्षीय युवकाचा छातीत चाकुने भोसकून खून केल्याचा खळबळजनक प्रकार वर्दळीच्या ठिकाणी घडला असून खून होत असताना उपस्थित लोकांनी हा घटनाक्रम उघड्या डोळ्यांनी पाहिल्याने संताप व्यक्त होत आहे.
                घटनास्थळी पडलेला चाकू
आज दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान शहरातील मुरमुरागल्ली भागातील राधे गोविंद ट्रेडींग कंपनी आणि श्री सेवा ट्रेडींग कंपनी या दोन दुकाना समोरील रस्त्यावर लखन उत्तम जाधव, वय 30, रा.देवापुर ता. मुदखेड या युवकाच्या छातीत खंजीर खुपसून दुसऱ्या युवकाने खून केला. मुरमुरा गल्लीत घटनास्थळी खून केलेला चाकू आढळून आलेला आहे. मुरमुरागल्ली हे नेहमीच वर्दळीचे ठिकाण आहे. ऐन गर्दीत एका युवकावर दुसऱ्या युवकाने भरदिवसा शेकडो लोकांच्या साक्षीने हल्ला केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. त्या ठिकाणी मयत युवकाचे आधारकार्ड पोलीसांना सापडले असून घटनेची माहिती मिळताच वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस अंमलदार अजय यादव, प्रकाश राठोड,अंकुश पवार, बाबूराव डवरे, बबन बेडदे यांच्यासह अनेकजण पोहचले. घडलेल्या घटनेची सर्व माहिती घेवून पोलीसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.
ऐन शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या खुनाने शहरात खळबळ उडाली असून खुनाचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. पोलीस आता या प्रकरणाचे पुरावे जमा करतील तेंव्हा खऱ्या अर्थाने ज्यांनी हा खून पाहिलेला आहे त्या प्रत्यक्षदर्शीनी पोलीसांना तपासाकामी मदत केल्यास गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश येईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.