नायगावच्या धुप्पा येथे मतदानातून तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षाची निवड.
नायगाव, नांदेड –
तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष होण्यासाठी नायगाव तालुक्यातील धुप्पा येथे चढाओढ निर्माण झाल्याने अध्यक्ष निवडीसाठी मतदान घ्यावे लागले. यात गणपतराव दरेगावे यांनी ४१ मतांची आघाडी घेवून विजय मिळवला.
गावातील तंटे गावातच मिटावेत आणि गावातील शांतता अबाधित राहण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून तंटामुक्त गाव समित्या अस्तित्वात आल्या. सुरुवातीला या समित्यानी प्रभावी काम केले पण नंतर या समित्यांना मरगळ आली असल्याने त्या केवळ नामधारीच ठरल्या आहेत. पण तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष होण्यासाठी मात्र ग्रामीण भागात मोठी चढाओढ लागत असून अनेक ठिकाणी मोठी चुरस निर्माण होत आहे.
धुप्पा ता.नायगाव येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय ग्रामसभेत चर्चेला आल्यानंतर अशोक मारोती डुकरे, सुधाकर गणपत दरेगावे यांनी अध्यक्ष होण्याची अर्ज भरला. दोघापैकी कुणीही माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे मतदानाद्वारे निवड करण्याचे निश्चित झाले. ४६२ मतदारापैकी ४४५ मतदान झाले. यात सुधाकर दरेगावे यांना २४१ मते मिळाली त्यामुळे व त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी प्रल्हाद गोरे यांनी केली.
निवडीनंतर ग्रामपंचायतच्या वतीने सुधाकर दरेगावे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणपतराव पाटील, जळसिंगराव पाटील, मारोतराव गुरुजी, माधवराव कंधारे, मारोतराव वडे, शिवकांत कंधारे, गंगाधर दरेगावे, शिवराज पाटील, सिताराम पाटील, हणमंत हणमंते, दगडोजी बनसोडे, माधव डोंगळे, संजय जमादार, अनिल जांभळे, गोविंद पांचाळ, शिवाजी पालंगे, हणमंत जांभळे, गंगाधर पाटील, बजरंग पाटील, यांसह आदींची उपस्थिती होती. ही प्रक्रिया योग्य पार पाडण्यासाठी पोलिस जमादार सी.एम.चाट्टे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.