नायगाव नगरपंचायतमध्ये डझनभर उमेदवारांनी घेतली माघार ; नाट्यमय घडामोडीत भाजपच्या दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपला काँग्रेसचा दे धक्का

आ.राजेश पवारांना माजी आ.चव्हाणांचा जबरदस्त झटका

1,204
नायगाव, नांदेड –
नायगाव नगरपंचायत निवडणुकीत नामांकन माघार घेण्याच्या १३ डिसेंबर या शेवटच्या दिवशी ४३ पैकी १२ म्हणजे डझनभर उमेदवारांनी माघार घेतली असून, काँग्रेसच्या वतीने झालेल्या नाट्यमय घडामोडीत भाजपच्या दोन उमेदवार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपला चांगलाच झटका बसला आहे.  विद्यमान आमदार तथा भाजपचे नायगाव नगर पंचायत निवडणूक प्रभारी राजेश पवार यांच्या नेतृत्वाला धक्का देत, काँग्रेसचे माजी आ. तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंत चव्हाण यांनी आ.पवार यांच्या भाजपच्या वतीने १७ जणांना उमेदवारी देत उभारलेल्या भाजपच्या गडाला दोन उमेदवारांची माघार घडवून  चांगलाच सुरुंग लावला आहे. यामुळे वसंत चव्हाण यांची नायगाव शहरावरची पकड यातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
नायगाव नगरपंचायतच्या निवडणुकीत १७ पैकी प्रभाग ९,११,१७ ची निवडणूक ओबीसीच्या न्यायालयीन निर्णयाने रद्द झाली उर्वरित १४ प्रभागा मधील प्रभाग १२ व प्रभाग ८ या दोनचा निकाल न्याय प्रविष्ट असून हा निकाल १४ डिसेंबर रोजी लागणार आहे.यामुळे या प्रभागाची नामांकन माघार घ्यायची तारीख १६ डिसेंबर ही आहे. प्रभाग ३ च्या भाजप उमेदवार आकांक्षा प्रकाश कुऱ्हाडे यांनी नाट्यमय घडामोडीत प्रभाग ३ मधून आपला अर्ज माघार घेतल्याने भाजपवर चांगलीच नामुष्कीची वेळ आली आहे. येथील एकमेव काँग्रेस उमेदवार सुमनबाई भीमराव सोनकांबळे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. 
प्रभाग क्र. ९ मधून भाजपच्या सयद रबियाबी बाबू यांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या गीता नारायण जाधव या एकमेव उमेदवार शिल्लक राहिल्या असून येथील भाजपचे दोन क्रमांकचे उमेदवार रहमेतबी गनी यांनी माझा उमेदवारी अर्ज गृहीत धरून मला बी फार्म जोडावा अशी लेखी पुराव्यासह विनंती केली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी हा निर्णय राखून ठेवल्याने रहमेतबी यांचे प्रतिनिधी चिरंजीव करीम चाऊस हे औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले आहे.
भाजप उमेदवाराच्या पतीचा माजी आ.वसंत चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश
भाजप उमेदवार पती सय्यद बाबूसाब यांनी माजी आ.वसंत चव्हाण व निरीक्षक विजय येवनकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, शिक्षण सभापती संजय बेळगे, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणेवार, श्रीधर पा.चव्हाण आदींच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला असून भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
अन्य माघार घेतलेले उमेदवार असे-
प्रभाग १ मधून अनुसया दत्तात्रय शिंदे (अपक्ष,) अजिंक्य दिगंबर कल्याण (अपक्ष), प्रभाग ६ मधून शोभा माधवराव चव्हाण(अपक्ष), प्रभाग ८ मधून चंद्रकांत रमेश पवार (शिवसेना), प्रभाग १०मधून चव्हाण पांडुरंग व्यंकट, अजय मधुकर भद्रे, केशव पुंडलीक भालेराव, क्रांती प्रल्हाद भालेराव, या सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. प्रभाग 13 मधून ज्योती संजय तमलुरे अपक्ष, प्रभाग १४ मधून राधाबाई गणपती बॉईनवाड यांनी माघार घेतली आहे. ४३ पैकी १२ उमेदवारांनी १३ डिसेंबर रोजी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.