नायगाव नगरपंचायतसाठी ७९ टक्के मतदान ; ११ प्रभागातील २७ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद

785
नायगाव, नांदेड –
नायगाव नगरपंचायतीसाठी दि. २१ डिसेंबर रोजी झालेल्या ११ प्रभागातील सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानात एकूण ८०९३ मतदारांपैकी ६३९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ७९.४% टक्के मतदान झाले आहे. विठ्ठल नगर भागातील प्रभाग क्र.५ या  ठिकाणी बोगस मतदाराने मतदान केल्याचे उघड झाल्याने मतदान प्रक्रियेत काही काळ बाधा निर्माण झाली नंतर मतदान चालू झाले. मतदानात काही ठिकाणी किरकोळ प्रकार वगळता इतरत्र मतदान शांततेत पार पडले.
नायगाव  नगरपंचायत निवडणुकीच्या ११ प्रभागात १३ मतदान केंद्र होते तर २७ उमेदवार रिंगणात होते.या सर्वांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले आहे. ११ प्रभागात एकूण ८०९३ मतदार होते त्यातील ६३९७ मतदारांनी हक्क बजावला यातील ३३२५ पुरुष तर ३०७२ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला.एकूण ११ प्रभागात झालेल्या मतदानापैकी चव्हाण गल्ली प्रभाग क्र.१६ मध्ये सर्वाधिक म्हणजे ८८.३४ टके मतदान झाले तर प्रभाग १४ /२ मध्ये ६३.८९ टके म्हणजे सर्वात कमी मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निरीक्षक कपाले, सहायक पोलीस अधीक्षक मोरे यांनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या तर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी, पोलीस उप -अधीक्षक अर्चित चांडक, तहसीलदार गजानन शिंदे, पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, प्रभारी मुख्याधिकारी भोसीकर, पेशकार आलमवाड, यासह निवडणूक प्रक्रियेतील महसूल व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.
तोतया मतदारांवर सनदशीर मार्गाने कार्यवाही होणार -पो.नि.शिंदे.
प्रभाग क्र.५ मध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शिवसेना उमेदवार माधव कल्याण यांनी पी.आर.ओ.कडे केली होती. पी आर ओ सुभाष चव्हाण यांनी त्यानंतर सदर युवकास त्या ठिकाणी ताब्यात घेऊन बसून ठेवले व त्याच्याविरुद्ध कायदेशीर मार्गाने कार्यवाहीसाठी पोलिसात तक्रार दिली. अल्पवयीन मुलगा असल्याने बालकाचा सामाजिक पार्श्वभूमी अहवाल २०१५ नियम ८ प्रमाणे अधीन राहून कार्यवाही करण्यासाठी बाल न्यायालयाकडे अहवाल पाठवण्याची प्रक्रिया  चालू असल्याची माहिती भ्रमणध्वनी वरून पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.