नायगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपला न्यायालयाच्याही निकालाचा फटका

प्रभाग १३ च्या भाजप उमेदवार पार्वतीबाई चव्हाण यांचा अर्ज अवैध

515
नांदेड, नायगाव –
नायगाव नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपा उमेदवार पार्वतीबाई शंकरराव चव्हाण यांचे अपिल दि.१५ डिसेंबर रोजी बिलोली सत्र न्यायलयायाने फेटाळल्याने भाजपच्या नगरसेविका राहिलेल्या पार्वतीबाई चव्हाण यांच्या उमेदवारीची आशा मावळली असून दुसऱ्या क्रमांकाच्या लताबाई तमलुरे यांचे नामांकन गृहीत धरून भाजपाने प्रभाग १३ च्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
नगरपंचायत निवडणुकीत छाननीमध्ये प्रभाग १३ च्या बाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुचकांनी स्वाक्षरी न केल्याने भाजप उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र नाकारले होते या विरुद्ध माजी नगरसेविका तथा भाजप उमेदवार पार्वतीबाई चव्हाण यांनी बिलोली येथील न्यायालयात दाद मागितली होती. या विरुद्ध निकाल देताना निवडणूक अधिकारी यांनी घेतलेल्या अर्ज नाकारण्याच्या आदेशात हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही, असा अभिप्राय नोंदवत बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने नायगाव नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपा उमेदवार पार्वतीबाई शंकरराव चव्हाण यांचे अपिल दि. १५ रोजी फेटाळले आहे.  यामुळे भाजपला धक्का बसला असून भाजपला दुधावरची तहान ताकावर भागवत दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार सौ.ललीताबाई तमलुरे यांच्या माध्यमातून निवडणूक लडवणे भाग पडले आहे.

नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. १३ मधून निवडणुकीच्या मैदानात असलेल्या भाजपा उमेदवार श्रीमती पार्वतीबाई शंकरराव चव्हाण यांचे नामनिर्देशन पत्रावर सुचकाची सही नसल्याच्या कारणावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज अवैध ठरवला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या निर्णयाला ॲड.एन.एस. लंगडापुरे यांच्या मार्फत बिलोली सत्र न्यायालयात महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगर पंचायत निवडणूक 1966 च्या नियम 15 अन्वये हे अपील करण्यात आले होते. कारण नामनिर्देशन फॉर्मवर सुचकाची प्रस्तावकांवर स्वाक्षरी नसणे हा अनावधानाने झालेला परिणाम होता. हा दोष चारित्र्यामध्ये महत्त्वाचा नाही असा युक्तिवाद अपीलकर्त्याने केला होता. स्वाक्षरी संलग्न करणे अनिवार्य असल्याने सुचकांची स्वाक्षरी नसणे हा एक मोठा दोष आहे. त्यामुळे अपील योग्य नाही, असे म्हणत बिलोली न्यायालयाने हे प्रकरण फेटाळले आहे. यामुळे आता काँगेसचे अर्चना संजय चव्हाण यांच्या विरुद्ध भाजपच्या ललिताबाई तमलुरे यांच्यात दुरंगी सामना होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.