पेट्रोलिंग दरम्यान माहूर पोलिसाची धडक कारवाई; प्रतिबंधित गुटख्यासह घातक शस्त्रे व वाहन असा १७ लाख ५९ हजारचा मुद्देमाल जप्त.

564

जयकुमार अडकीने
माहूर, नांदेड –

आज दि.२२ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान रात्रीच्या गस्तीवर असलेल्या माहूर पोलिसांना माहूर शहरातील बसस्थानक परिसरात चारचाकी वाहन क्र.०४ एफ.एफ. ३०२० हे संशयास्पदरित्या जात असल्याचे दिसून आल्याने सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनात १७ लाख ५९ हजार रुपये किमतीचा विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा व मानवी जीवित्वास घातक शस्त्रे आढळून आली.

शहरातील गौसिया फर्टिलायझरस या कृषी केंद्रासमोर गस्त घालणाऱ्या माहूर पोलिसांना सदरील संशयित वाहन दिसून आल्याने अधिक पाहणी केली असता नायलॉनच्या एका पांढऱ्या पोत्यात १ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा विमल पान मसाला, ३१ हजार २०० रु.किंमतीचा सुगंधित तंबाखू, ५७ हजार रु.किंमतीचा राजनिवास सुंगधी पान मसाला, १४ हजार रुपये किंमतीचा प्रीमियम सुगंधी तंबाखू, १५ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही चारचाकी वाहन असा एकूण १७ लाख ५९ हजारचा मुद्देमालसह २० सेंटीमीटर लांब व ४ सेमी रुंद धारदार पाते असलेला सुरा, व १० से.मी.लांब व ३ से.मी. रुंद खटक्याचा चाकू सदर वाहनात आढळला.

शहरातील सोनापीर दर्गाह परिसरात राहत असलेला बाबर अहेमद शेख फकीर महम्मद मुजावर असे नाव असलेले आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांनी झडतीमध्ये जप्त केले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक नामदेव रिठे स.पो.नि. अण्णासाहेब पवार,पो.हे.कॉ.आनंदराव राठोड,पो.कॉ.साहेबराव सगरोळीकर, चालक रामचंद्र दराडे पो.ना.छगन जाधव यांच्या पथकाने केली. तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या माहूर क्षेत्रावरही अवैध व्यवसायिकांनी डेरा मांडला असून घातक शस्त्रे बाळगून सशस्त्र गुन्हेगारी करण्याचे हेतू ठेऊन अवैध व्यवसाय करणाऱ्या टोळीचा माहूर पोलिसांनी पर्दाफाश केल्याने माहूर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, माहूर तीर्थक्षेत्राचे नावलौकिकास बाधा पोहचविण्याचे कृत्य करणाऱ्या आरोपीच्या साखळीचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळून माहूर तीर्थक्षेत्रावर अवैध व्यवसायाचे स्तोम वाढवू पाहणाऱ्या प्रवृतींना आळा घालावा अशी अपेक्षा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थाप्रेमी नागरीकातून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.