पोलिसांची बदनामी करणाऱ्या विरुद्ध कुंटूरमध्ये गुन्हा दाखल ; गणपती मूर्तीची विटंबना केल्याचा केला होता बनाव.

462

नायगाव, नांदेड –

गणपती विसर्जनाच्या वेळी वाद्य वाजवून नाचण्यास मनाई करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा राग मनात धरून पोलीसांनी गणपतीची विटंबना केल्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात मनुर येथील पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहीती सपोनि महादेव पुरी यांनी दिली आहे .

याबाबत मिळालेली माहिती अशी की दि. १९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम सर्वत्र सुरू होता. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने कुंटूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर तैनात होते. कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करत प्रत्येक गणेश मंडळाने गणेशांचे विसर्जन करावे या अनुषंगाने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना देण्यात आल्या होत्या.

मनुर ता.नायगाव येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी याच पद्धतीने बाल गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांना माहिती दिली मात्र मिरवणुकीत वाद्य वाजवून नाचू का दिले नाही हा राग मनात धरून येथील संजय मारुती शिंदे आणि अन्य चार जणांनी ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत उभे राहून गणपतीची मूर्ती हातात धरून श्री गणपतीची विटंबना पोलिसांनी केली आहे. शिवाय पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केला असा बिनबुडाचा आरोप केला.हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करून पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस आणि समाज यांच्या तेढ निर्माण व्हावे, धार्मिक दंगल निर्माण व्हावी या अनुषंगाने संजय मारुती शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सामाजिक दुष्कृत्येविरुद्ध कुंटूर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शन खाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येवले हे करत आहेत.

दरम्यान मनुर येथे कोणत्याही प्रकारे गणपतीची विटंबना करण्यात आलेली नाही. केवळ पोलिसांची बदनामी करण्याच्या अनुषंगाने जाणीवपूर्वक संबंधिताने व्हिडिओ करून तो व्हायरल केला. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.