पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई; तीन किलोमीटर पाठलाग करून अट्टल चोरट्यास केली अटक.
एपीआय चंद्रकांत पवार यांची धाडसी कामगिरी.
नांदेड-
गस्तीवर असलेल्या लिंबगाव पोलिसांनी कत्तीचा धाक दाखवून व अंगावर मिरचीची पूड टाकून लुटणाऱ्या चोरट्यांना तब्बल तीन किलोमीटर पाठलाग करून सिनेस्टाईल अटक केली. चोरट्यांकडून एक धारदार कत्ती, मिरचीपूड जप्त केली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी सोमवारी दि. सहा रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हस्सापुर परिसरात केली.
विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालय वसाहतीत राहणारा युवक हा आपल्या पूर्णा येथील नातेवाईकाकडे जात असताना त्याला दोन चोरट्यांनी नवीन हसापूर पश्चिम वळण रस्त्यावर अडविले. कत्तीचा धाक दाखवून त्याला मारहाण करून त्याच्याकडील पंधरा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जबरीने चोरून घेतला. यादरम्यान तो भीतीने आपली दुचाकी (एमएच- २६बीयु- ९४४६) सोडून पळत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली.
याच दरम्यान लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार हे आपले सहकारी मुंजाजी चौरे, उत्तम देवकते, गजानन खंडागळे, रमेश चव्हाण, विजय तोडसाम, जगन्नाथ केंद्रे, सोमनाथ स्वामी आणि होमगार्ड मारुती कानडे यांच्यासह आपल्या हद्दीत गस्त घालत होते. या युवकाला मारहाण करताना पवार यांनी पाहताच आपले शासकीय वाहन घटनास्थळी नेले. यावेळी एका चोरट्यास जाग्यावर पकडले. मात्र दुसरा चोरटा हातात कत्ती घेऊन भोईवाडा हसापुर परिसरात पळाला. त्याचा पाठलाग करून अखेर पोलिसांनी त्यालाही जेरबंद केले. आरोपी पुढे आणि पोलिस मागे हा थरार जवळपास एक तासानंतर समाप्त झाला.
चोरट्यांच्या ताब्यातून मिरचीपूड व कत्ती पोलिसांनी जप्त केली. अटक केलेल्या शेख अकबर शेख गौस (वय २२) राहणार खडकपुरा आणि शेख अफरोज शेख अफसर (वय २९) राहणार नवीन हसापुर यांच्याविरुद्ध शुद्धोधन वाघमारे याच्या फिर्यादीवरून लिंबगाव पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमृत केंद्रे करत आहेत.
पोलिसाची गाडी वेळेवर आली नसती तर नक्कीच मोठी दुर्घटना घडली असती. कारण सिद्धोधन वाघमारे या विद्यार्थ्याच्या अंगावर मिरचीपूड टाकून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वाघमारे याने फिर्यादीत तसे नमूद केले आहे. पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांना खडकपुरा भागात चांगला प्रसाद दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्या धाडसी कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलल्या जात आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय कबाडे, निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख यांनी लिंबगाव पोलिसांचे कौतुक केले आहे.