पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद;रामतीर्थ पोलिस ठाणे हद्दीत ६८० जणांचे लसीकरण.

गणेश मंडळांचा अभिनव उपक्रम.

231

नायगाव, नांदेड –

कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारीने निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत यंदा गणेश मंडळांनी कोणताही उपक्रम न घेता कोविड लसीकरणाचे शिबीर आयोजित करावे, असे रामतिर्थ पोलिसांनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून हद्दीतील अनेक गावातील गणेश मंडळांनी राबविलेल्या या उपक्रमात ६८० नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमावर निर्बंध लावल्याने गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्यात आले होते. यावर्षी कोरोना संसर्ग कमी झाल्याने सर्वत्र गणेशोत्सवाची धुमधडाक्यात सुरुवात झाली रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६० गणेशाची स्थापना करण्यात आली होती तर २६ गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली होती.रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावात सपोनि विजय जाधव यांनी सामाजिक उपक्रमासह लोककल्याणकारी सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. या बरोबर कोविड लसीकरण शिबिर राबविण्यात यावे असे आवाहन देखील करण्यात आले होते. शिवाय प्रत्येक गणेश मंडळांना भेटी देऊन सुचना केल्या होत्या. त्यामुळे अनेक गावातील गणेश मंडळांनी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला.दरम्यान या उपक्रमात खतगाव ७१,बोरगाव (थडी)१५६,आळंदी १२४,आदमपुर १२२,अटकळी ७७,टाकळी ३०,रामतिर्थ ७०,गळेगाव येथील ३० नागरीकांना लसीकरण देण्यात आले असल्याची माहीती सपोनि विजय जाधव यांनी दिली आहे.

लसीकरणासाठी डॉक्टरांचे सहकार्य लाभले. हा अभिनव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व मंडळाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान या उपक्रमात सहभाग घेतलेल्या गणेश मंडळांना येत्या काही दिवसांत सन्मान पत्र व ट्रॉफी देऊन पोलिस ठाण्यात सन्मान करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकारी विजय जाधव यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.