पोलीस नाईक अमोल उगवे यांचे पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

934
नांदेड –
नांदेडच्या हडको परिसरातील मुळ रहिवासी व सोनखेड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या ३६ वर्षीय पो.ना.अमोल भाऊलाल उगवे (बक्कल नं.४९८) यांचा रक्ताच्या उलट्या होवून उपचारा दरम्यान मृत्यू झाला.ही घटना १३ डिसेंबर रोजी सकाळी नांदेड शहरातील एका प्रसिद्ध खाजगी रूग्णालयात घडली आहे. दिवंगत अमोल उगवे यांच्या पार्थिव देहावर १३ डिसेंबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान, नांदेड पोलीस दलाच्या वतीने नांदेडच्या सिडको भागातील वैकुंठधाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या सिडको वसाहती अंतर्गत असलेल्या एनडी.ए- ११९ हडको परिसरातील मुळ रहिवासी असलेले अमोल भाऊलाल उगवे (बक्कल नं. ४९८) हे सोनखेड (ता.लोहा जि.नांदेड) येथील पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून नेमणुकीस होते. दरम्यान, पो.ना.अमोल उगवे यांना ११ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान, त्यांच्या राहत्या घरी अचानक रक्ताच्या उलट्या होवू लागल्या.त्याचवेळी, नातेवाईकांनी पो.ना.अमोल उगवे यांना अधिक उपचाराकरिता नांदेड शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना अखेर १३ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान, डॉक्टरांनी पो.ना.अमोल उगवे यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस म.पो.कॉ.ज्योती आंबटवार यांनी दिली आहे.
याप्रकरणी अविनाश भाऊलाल उगवे (रा. एनडी.ए-११९, हडको, नांदेड) यांनी दिलेल्या माहितीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पो.नि.अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख जावेद हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले. विशेष बाब म्हणजे, पोलीस नाईक अमोल उगवे यांच्या पार्थिवावर १३ डिसेंबरच्या रात्री साडेआठच्या दरम्यान नांदेड पोलीस दलाच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी डीवायएसपी.डॉ. सिध्देश्वर भोरे व नांदेड ग्रामीण ठाण्याचे पो.नि.अशोक घोरबांड, नांदेड रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो.नि.महादेव मांजरमकर, पोउपनि.चंदन परिवार व नांदेड पोलीस दलातील असंख्य पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. प्रारंभी, पोलीस दलाच्याही वतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून पो.ना.अमोल उगवे यांना शोक सलामी देण्यात आली आहे. यावेळी नांदेड पोलीस दलाच्या वतीने तसेच नवीन नांदेडातील विविध राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्याही वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलीस नाईक दिवंगत अमोल उगवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. पो.ना.अमोल उगवे यांच्या आकस्मिक मृत्युबद्दल पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नवीन नांदेडात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.