बदली झालेल्या तहसीलदार वरणगावकरचा निरोप समारंभ बनला चर्चेचा विषय.!एकीकडे निरोप तर दुसरीकडे बदलीचा आनंदोत्सवात फटाक्याची आतषबाजी.!

एक निरोप समारंभ असाही, बनला उलटसुलट चर्चेचा विषय. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत निरोप. आयोजकांच्या ७५ टक्के खुर्च्या रिकाम्याच.

1,125

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –
गेल्या कित्येक वर्षापासून माहूर तालुक्यात नौकरी करून बदली झालेल्या अधिकाऱ्यास आदरयुक्त भावनेने त्याने तालुक्यासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करीत पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देऊन निरोप देण्याची माहूरची परंपरा वादग्रस्त तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या निरोप समारंभात मोडीत निघाली असून हा निरोप समारंभ माहूर तालुक्यात उलटसुलट चर्चेचा विषय बनला आहे.

माहूर येथे अंदाजे सात वर्षापूर्वी नायब तहसीलदार पदावर रुजू होऊन नंतर येथील बदली झालेल्या तहसीलदाराच्या रिक्त पदावर प्रभारी नियुक्ती मिळवून त्यानंतर माहूर येथे नियुक्ती झालेल्या ५ तहसीलदारांच्या बदल्या मंत्रालयातील लागेबांधे वापरून रद्द करवून घेत उदभवलेल्या स्थिती व तांत्रिक बाबीचा फायदा घेत तहसीलदार पदावर नियुक्ती करवून घेतली. पदोन्नतीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महिने बदली करून पदोन्नती नंतर पुन्हा माहूरलाच रुजू होऊन माहूर येथे एकाधिकारशाही व हुकुमशाही गाजविणाऱ्या माहूरच्या वादग्रस्त तहसीलदार वरणगावकर यांना आपल्या विरुद्ध महाविकास आघाडी व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक तक्रारी सादर केल्याची माहिती मिळाल्यानंतर आपली बदली होणारच या अनुषंगाने मंत्रालयातील लागेबांध्याचा फायदा घेत वैद्यकीय कारण पुढे करून विनंती बदलीची मागणी अर्ज सादर करून आपल्या गावानजीक संग्रामपुर जि.बुलढाणा येथे बदली करवून घेतली.

दि.१७ सप्टें रोजी बदलीचे आदेश धडकल्याने माहूर तालुक्यात शासनाच्या या आदेशाचे सर्वस्तरातून जोरदार स्वागत झाल्यामुळे हा निरोप समारंभ माहूर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. वादग्रस्त तहसीलदाराच्या बदलीने झालेल्या काही प्रमाणात नाराज झालेल्या काही चेलेचपट्यानी दि.२० सप्टें रोजी सायंकाळी ७ वाजता जगदंबा धर्मशाळेत भव्य दिव्य निरोप समारंभाचे आयोजन केले. १०० ते १५० खुर्च्याची व्यवस्था करून उरली सुरली इभ्रत वाचविण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला होता. परंतु काही ब्रम्हवृंद, काही भाजप कार्यकर्ते व आयोजक मंडळीचे काही हस्तक वगळता कुणीही या निरोप समारंभाला हजेरी लावली नाही.

या निरोप समारंभास भाजपा किनवट विधानसभा अध्यक्ष अॅड.रमण जायभाये,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड, भाजप शहराध्यक्ष सागर महामुने, नगराध्यक्ष कु. शीतल जाधव, रेणुकादेवी संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, अरविंद देव, आशिष जोशी, ब्रम्हवृंद अनुदीप कोरटकर, गजानन समुद्रे, विजय आमले, अपील बेलखोडे, भाजपा कार्यकर्ते, अर्चना दराडे, पद्मा गिरे, संजय पेंदोर, नंदकुमार जोशी व इतर मध्ये सोनापीर दर्गाहचे मुजावर फकीर महम्मद, वसंत कपाटे, जयंत गीऱ्हे, राजू दराडे, महाजन, तामखाने , राज ठाकूर, सुरेश गीऱ्हे, वरणगावकर यांच्या सोबत असलेले अव्वल कारकून संतोष पवार यांच्यासह बोटावर मोजण्याइतकीच उपस्थिती होती. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, मनसे, एमआयएम, प्रहार जनशक्ती, वंचित बहुजन आघाडी,गोर सेना, संभाजी ब्रिगेड व इतर कुणीही सामाजिक कार्यकर्ते यांनी या निरोप समारंभाकडे पाठ फिरविल्याने अनेक खुर्च्या रिकाम्याच राहिल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे शहरातील काही कार्यकर्त्यांनी निरोप समारंभ सोहळ्याच्या वेळेचे नियोजन साधून शहरात बदलीचा आनंदोत्सव साजरा केल्याचे दिसून आले.

सात वर्ष माहूर शहरात प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्याच्या झालेल्या बदलीनंतरच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात एकीकडे निरोप समारंभ तर दुसरीकडे बदली झाल्याचा आनंदोत्सवात फटाक्याची आतषबाजी व तालुक्यातील भाजप व्यतिरिक्त इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे निरोप समारंभास पाठ फिरविणे हे नेमके कशाचे द्योतक आहे याची तालुकाभर सुरस चर्चा होत असून वादग्रस्त तहसीलदार वरणगावकर यांनी त्यांच्या निरोप समारंभाला उपस्थित डोकी मोजून असे का ? याचे आत्मपरीक्षण करून बदली झालेल्या ठिकाणी तरी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा असे माहूर तालुक्यातील जेष्ठ नागरिक व जाणकार नागरीकामधून प्रतिक्रिया येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.