बळीरामपूर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचानंतर आता उपसरपंच यांच्या विरोधातही अविश्वासाचा ठराव!

587

नांदेड –
नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीरामपूर येथील ग्राम पंचायतचे लोकनियुक्त सरपंच अमोल गोडबोले यांच्या विरोधात १४ ग्रा. पं. सदस्यांनी अविश्वासाचा ठराव पारित केला होता. याशिवाय, १६ सप्टेंबर रोजी जनतेनेही मतदानाच्याद्वारे सरपंच अमोल गोडबोले यांच्या विरोधातील ‘अविश्वासा’च्या ठरावावर शिक्कामोर्तब करून त्यांना बळीरामपूर येथील ‘सरपंच’ पदावरून पायउतार केले आहे.

ही घटना ताजी असतानाच, आता विद्यमान १४ ग्रा. पं. सदस्य बळीरामपुरच्या उप सरपंच सागरबाई वाघमारे यांच्या विरोधातही लवकरच अविश्वासाचा ठराव पारित करण्याच्या जय्यत तयारीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. बळीरामपूर ग्राम पंचायतचे लोकनियुक्त सरपंच अमोल गोडबोले यांच्या विरोधातील अविश्वासाच्या ठरावासंदर्भात १६ सप्टेंबर रोजी विशेष ग्राम सभेनंतर जि.प. प्राथमिक शाळा,बळीरामपूर येथे गुप्त मतदान घेण्यात आले. प्रत्यक्ष गुप्त मतदानाच्याद्वारे सरपंच अमोल गोडबोले यांच्याबाजूने ८४० मतदारांनी मतदान केले, तर तब्बल १ हजार ११ मतदारांनी अमोल गोडबोले यांचे विरोधात मतदान केले. परिणामी, सरपंच अमोल गोडबोले यांच्या विरोधातील अविश्वासाचा ठराव १ हजार ११ विरूद्ध ९४० मतांच्या फरकाने पारित करण्यात आला आहे. ही घटना ताजी असतानाच आता बळीरामपूरच्या १४ ग्रा. पं. सदस्यांनी उपसरपंच सागरबाई वाघमारे यांच्या विरोधातही ‘अविश्वासा’चा ठराव मांडू इच्छित असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

बळीरामपूर येथील उपसरपंच सागरबाई वाघमारे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडू इच्छिणाऱ्या ग्रा. पं. सदस्यांच्या यादीत अशोक आनंदा वाघमारे, धम्मदिप रामा एंगडे, अनुराधा किशनराव गव्हाणे, शुध्दोधन निवृत्ती एंगडे व विजय यशवंत हाटकर यांचेसह इंद्रजित जळबा पांचाळ, शेख सलीम शे. राजेसाब, मधुकर गणपत आढाव, सागरबाई माधव जाधव, प्रयागबाई किशन धोत्रे, गुणाबाई संभाजी पंडीत,उर्मिला गणेश जिंदम,रंजनाबाई संजय सोनकांबळे, राधेश्याम गोविंद सुंकेवार आणि व्यंकुबाई गंगाराम वाघमारे यांचा समावेश असल्याचीही विश्वसनीय अर्थात खात्रीशीर माहीती आहे.

विशेष बाब म्हणजे, बळीरामपूर येथील ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अमोल गोडबोले यांच्या विरोधामधील अविश्वासाचा ठराव जनतेकडूनही प्रत्यक्ष मतदानाद्वारे नुकताच पारित झाला. हा ठराव पारित होवून केवळ सहा दिवसाचा कालावधी उलटलाही नाही, तर आता उपरोल्लेखित १४ ग्रा.पं.सदस्यांनी बळीरामपूरच्या उपसरपंच सागरबाई विठ्ठल वाघमारे यांच्या विरोधातही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेवून काम न करणे, गावात विकासाची कामे न करणे, पंचायतच्या सभेत सदस्यांना जमा खर्चाचा हिशोब न दाखवणे, गावातील पाणी पुरवठा सुरळीत न ठेवणे, गावात स्वच्छता अभियान न राबविणे, व ग्राम पंचायतमधील कारभारावर देखरेख न करणे या कारणांसाठी पंचायतच्या सभेत अविश्वासाचा ठराव मांडू इच्छितो, असा उल्लेखही नांदेड येथील तहसीलदार यांच्या कार्यालयात २१ सप्टेंबर रोजी दिलेल्या लेखी निवेदनात आहे.

याशिवाय, महत्वपूर्ण बाब म्हणजे, बळीरामपुरच्या उपसरपंच सागरबाई विठ्ठल वाघमारे यांच्या विरोधातील अविश्वासाच्या ठरावासंदर्भात निवेदन देवून उपरोल्लेखित १४ ग्राम पंचायत सदस्य हे पाच ते सात दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी रवाना झाले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. एकूणच, बळीरामपूर येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अमोल पांडुरंग गोडबोले यांच्यापाठोपाठ आता बळीरामपुरच्या उप सरपंच सागरबाई वाघमारे यांनाही उपसरपंच या पदावरून पायउतारच व्हावे लागते की काय, याकडे बळीरामपूर येथील सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही बाब देखील तेवढीच सत्य आहे. असे जर झाले, तर बळीरामपूर ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंचपदावर कोण विराजमान होईल, याकडेही बळीरामपुरवासियांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.