बिलोली तालुक्यातील गंजगाव ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच सौ. सुनिता कनशेटे आपल्या पदाचा कारभार हातात घेतल्यापासून नेहमीच वादाच्या भोव-यात असतात, सातत्याने काही प्रभागात होणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतुन ग्रामपंचायत स्तरावर नळ योजना राबवित आहेत यामुळे गावात पाण्याचे नळ वाहतील अशी अपेक्षा होती पण तसे काही झाले नाही लाखो रुपयांचा निधी मिळाला पण गावात नळाला काही पाणी आले नाही त्यामुळे हे पैसे पाण्यात गेले की कुणाच्या घशात? असा सवाल येथील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. एकुणच पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी योजलेल्या उपाययोजना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कशा कुचकामी ठरतात याचा प्रत्यय गंजगावात आला आहे.
बिलोली तालुक्यातील गंजगाव हे रेतीच्या ठेक्यामुळे मोठ्या चर्चेत आलेलं गाव आहे. इतर गावाच्या मानाने मोठी लोकवस्ती असलेल्या या गावात सध्या काही प्रभागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. शासनाचे लाखो रुपये निधी खर्च झाल्यानंतर रहिवाशांना पाणी मिळणे अपेक्षित होते पण तसे झालेले नाही. नळयोजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून एक ग्लास सुध्दा पाणी नळाला आलेले नाही, शासनाची एवढी मोठी रक्कम कोणत्या पाण्यात वाहुन गेले कळले नाही. सरपंच व ग्रामसेवक यांच्या अर्थपूर्ण संबधामुळे व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या नळ योजनेचे तीनतेरा वाजल्याचे दिसुन येत आहे. नळयोजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून यांची सखोल चौकशी करुन सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार कायद्या अंतर्गत कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे.