अर्धापूर शहरातील गट क्र.५४८ मध्ये बुरुड समाजाची स्मशानभूमी असून त्याबाबत तशी नोंद सात बाराच्या अभिलेखात आहे.महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग यांच्या शासन निर्णया अन्वये बुरुड समाज स्मशानभूमी विकसीत करण्यात आली आहे. अर्धापूर नगर पंचायतने या ठिकाणी बुरुड समाज स्मशान भूमी विकसीत करुन दहन शेड उभारले आहे. परंतु दि.१९ ते २१ जानेवारी या दरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी सदर स्मशान भूमीत असलेला दहन पिंजरा उखडून खाली फेकुन दिला त्यामुळे बुरुड समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
या प्रकरणी चौकशी करून यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करावी, दहन पिंजरा पुर्ववत प्रमाणे बसविण्यात यावा व यापुढे पुन्हा असा प्रकार घडणार नाही याबदल योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसिलदार अर्धापूर, मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय अर्धापूर, पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. यावेळी नगरसेवक बाबुराव लंगडे, नगरसेवक प्रल्हादराव माटे, माजी अध्यक्ष ओमप्रकाश पत्रे, जिल्हा बुरूड समाज संघटनेचे मोहन पटकोटवार, संजय हळदे, शहराध्यक्ष बालाजी गंधनवाड, नारायणराव गंधनवाड यांच्यासह बुरूड समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.