मंजूर कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून बँकेच्या बाहेर लाभार्थी पतीने गळफास घेवून केली आत्महत्या.

स्टेट बँक इंडिया नायगावच्या निष्काळजीपणाने घडला प्रकार.

2,428
नायगाव, नांदेड –
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून मंजूर झालेले कर्ज वाटप करण्यासाठी स्टेट बँक इंडिया शाखेकडून टाळाटाळ केल्याने देगाव ता. नायगाव येथील लाभार्थी आनंदा महाजन रोडे यांनी बँकेच्या समोर खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नायगाव शहरात घडली आहे.या घटनेने नायगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत असून बँकेच्या वाढत्या दलाली बद्दल व गैरप्रकारांबद्दल सर्वसामान्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या बद्दल अधिक वृत्त असे की, आनंदा रोडे हे मूळ देगाव येथील रहिवाशी असून ते नायगाव नगरपंचायत मध्ये कंत्राटी रोजगार म्हणून काम करीत होते.त्यांच्या पत्नी सुशीला बाई आनंदा रोडे यांच्या नावे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळा कडून २०१८ मध्ये किराणा दुकान टाकण्या साठी पाच लाख रुपये कर्ज मंजूर झाले होते.तसे पत्र बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक यांना दिले होते व त्यात १५ दिवसात कार्यवाही करण्यासाठी सांगितले होते.
आनंदा रोडे यांनी बँकेचे शाखाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता अगोदर आज नाही पुन्हा या असे म्हणत प्रकरण प्रलंबीत ठेवण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी आनंदा रोडे यांना हे कर्ज घेताना कुटुंबातील व्यक्तीच्या नावे इतर कर्ज असलेले तीस हजार रु.भरणा करण्यास सांगण्यात आले.अत्यंत हलाखीचे जीवन कंठणाऱ्या व मोल मजुरी करून जीवन जगणाऱ्या आनंदा रोडे यांनी पूर्वीचे कर्ज भरणा करण्याची परिस्थिती नसल्याने नवीन कर्ज मंजूर होऊन आल्या नंतर परत फेड करावी या उद्देशाने आनंदा रोडे यांनी खाजगी कर्ज काढून पैसे भरले. नंतर बँक अधिकाऱ्यांनी आम्ही येऊन गावात स्थळ पाहणी करतो म्हणून बरेच दिवस घातले.दलाला शिवाय काम होत नाही का काय, म्हणून रोडे यांनी मध्यस्थ घालण्याचा प्रयत्न केला पण तो अपुरा पडला.अत्यंत गैरकारभार करीत बँक व्यवस्थापन करणाऱ्या तत्कालीन व्यवस्थापक मीना यांची गैर कारभारावरून मुंबई येथे बदली झाली व शेवटी हे प्रकरण प्रलंबीत राहिले.त्यांच्या जागेवर आलेले शाखाधिकारी पवार यांनी या प्रकरणाचा श्रीगणेशा पुन्हा नव्याने सुरू केला.आपल्या हाताखालचे काम करणारे भूषण नावाचे अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या व दलालांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या पवार यांनी या प्रकरणात रोडे यांना नेहमी टाळाटाळ करीत तब्बल दोन वर्षांच्या वर हे प्रकरण प्रलंबीत ठेवले. कर्ज मिळेल या आशेने व्याजाने पैसे काढून बँकेत भरले पण बँक अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे रोडे यांचे काम तब्बल तीन वर्षे झाले मंजूर होऊन ही मिळत नसल्याने व अनेक उपाय योजून ही आपली या वर्षीची दिवाळी कर्जबाजारीपणाने अंधारातच गेली. हा प्रकार मनाला लागल्याने रोडे यांनी ६ नोव्हेंबर शनिवारी रात्री १० ते ११ च्या दरम्यान स्टेट बँक इंडिया शाखा डॉ.हेडगेवार चौकच्या बाहेर खिडकीच्या गजाला दोर बांधून आत्महत्या केली.

सदर घटना एका पादचारी व्यक्तीने पाहिल्यानंतर रात्रीच्या गस्तीवरील नायगाव पोलिसांना सांगितली पोलीस बांधवांनी घटनास्थळ गाठून मयताच्या गळ्यातील नगर पंचायत नायगावच्या ओळखपत्रावरून देगाव येथे नातेवाईक यांना संपर्क साधून प्रेत ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे उत्तरीय तपासणी साठी नेले.मयताचा मुलगा सतीश आनंदा रोडे, वय 28 वर्ष यांनी बँक अधिकारी यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून प्रारंभी आकस्मात मृत्यू क्र. 24 भादवी 174 प्रमाणे नोंद केली असून पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मुस्तापुरे हे अधिक तपास करीत आहेत.

घडलेली घटना दुर्दैवी,चौकशी अंती दोषींवर कार्यवाही.
-शंकर येरावार.
या प्रकरणा विषयी एसबीआय शाखा डॉ.हेडगेवारचे शाखाधिकारी पवार यांच्याशी संपर्क केला असता नेहमी प्रमाणे त्यांनी फोन घेणे टाळले.म्हणून क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक नांदेड शंकर येरावार यांना संपर्क केला असता ही घटना दुर्दैवी असून २०१८ पासून प्रकरण प्रलंबीत ठेवणारी अधिकारी वर्ग कोण? त्या मागचे कारण काय यासाठी वरिष्ठांनी आपणांस चौकशी करण्यासाठी सांगितले असून सोमवारी घटना स्थळ पाहणी व चौकशीसाठी नायगावला येणार आहोत यात चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव करू,असे येरावार यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.