महामुकाबल्यात टीम इंडिया चारीमुंड्या चीत; पाकिस्तानचा दमदार विजय.”विराट”सेनेचा १० गडी व १३ चेंडू राखून लाजिरवारणा पराभव.

भारताच्या २९ वर्षातील विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानकडून पहिलाच पराभव.

712

दुबई –

भारत-पाकिस्तान हाय-होल्टेज महामुकाबल्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तान संघाकडून भारत चारीमुंड्या चीत झाला आहे. १५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दणदणीत फलंदाजी करत सामना एकतर्फी केला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीही टीम इंडियाच्या गोलंदाजांना डोके वर काढण्याची संधी दिली नाही. सुरुवातीपासूनच या दोन्ही फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांवर वर्चस्व निर्माण केले.बाबर आझमने ५२ चेंडूत नाबाद ६८ आणि मोहम्मद रिझवानने ५५ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या.पाक संघाने १० गडी व १३ चेंडू राखून साामना जिंकून आपल्या नावावर केले.

कोहलीच्या नेतृत्वाखालील “विराट” सेना आणि “बाबर” आझमची फौज दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात एकमेकांसमोर भिडली.जगातील कोट्यवधी चाहत्यांचे डोळे या हाय होल्टेज सामन्याकडे रोखले गेले होते. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत ७ बाद १५१ धावा केल्या. पाक समोर विजयासाठी १५२ धावांचे आव्हान ठेवले होते. बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताला मात देत नव्या इतिहासाची नोंद केली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी व १३ चेंडू राखून पराभव केला. वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्ताने भारताला पहिल्यांदाच मात दिली आहे. पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, केएल राहुल हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विराट व पंतने किल्ला लढवला. विराटच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने सुरेख स्पेल टाकत रोहित, राहुल आणि विराटला माघारी धाडले. प्रत्युत्तरात सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम यांनी दमदार १५२ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. रिझवानने नाबाद ७९ तर बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी केली. आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पाक संघाचा डाव

कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी उत्तम सुरुवात केली. भुवनेश्वरने भारतासाठी पहिले षटक टाकले. या षटकात पाकिस्तानने बिनबाद १० धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताला विकेट मिळवण्यात अपयश आले. ६ षटकात पाकिस्तानने बिनबाद ४३ धावा केल्या. पॉवरप्लेनंतर रिझवान आणि बाबरने आक्रमक पवित्रा घेतला. १३व्या षटकात बाबरने वरुण चक्रवर्तीला शानदार षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात पाकिस्तानने शंभरी ओलांडली. बाबर पाठोपाठ रिझवाननेही बुमराहला चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले.१८व्या षटकात पाकिस्ताने विजयावर शिक्कामोर्तब केले. बाबरने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा, तर रिझवानने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७९ धावा केल्या.

भारतीय संघाचा डाव

केएल राहुल आणि रोहित शर्मा हे भारताकडून सलामीसाठी मैदानात उतरले. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदीने रोहित शर्माला शून्यावर पायचीत केले. तर तिसऱ्या षटकात त्याने राहुलचा त्रिफळा उडविला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकले. या षटकात त्याने सूर्यकुमारला यष्टीमागे झेलबाद केले. ६ षटकात भारताने ३ बाद ३६ धावा केल्या. या पडझडीनंतर विराट कोहली आणि ऋषभ पंतने भारतासाठी किल्ला लढवला. १२व्या षटकात पंतने हसन अलीला लागोपाठ २ षटकार खेचले. या षटकात विराट कोहली-ऋषभ पंतने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पुढच्याच षटकात पंतने आक्रमक पवित्रा घेत शादाब खानला मोठा फटका खेळला, मात्र तो झेलबाद झाला. पंतने २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. १५व्या षटकात भारताने शतक पूर्ण केले, तर १८व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात आफ्रिदीने विराटला बाद केले. विराटने ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या. २० षटकात भारताने ७ बाद १५१ धावा केल्या. हरीस रौफने पाकिस्तानसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात ७ धावा दिल्या. आफ्रिदीने ३१ धावांत ३, तर हसन अलीने ४४ धावांत २ बळी घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.