माधवराव पांडागळे यांचे धार्मिक कार्य वाखाणण्याजोगे.-जगदगुरू.

784

नांदेड –
माधवराव पांडागळे यांचे धार्मिक व सामाजिक कार्य हे खरोखरच वाखाणण्यासारखे आहे, असे प्रतिपादन श्री श्री श्री १००८ रावल पदवी विभुषीत भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी केदार जगदगुरू महाराज शिराढोणकर यांनी केले आहे.

नवीन नांदेड परिसरातील गोपाळचावडी येथील संगमेश्वर मंगल भवनात रविवारी ३ ऑक्टोबर रोजी कंधार येथील पं. स.चे माजी सभापती व काँग्रेसचे जेष्ठ नेते माधवराव पांडागळे, डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, माजलगावकर महाराज, राज्याचे माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, सितारामआप्पा एकलारे तसेच चंद्रभान पाटील जवळेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गोपाळचावडी येथील श्रध्दांजलीच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना जगदगुरू भिमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज शिराढोणकर बोलत होते.

या कार्यक्रमास माजी आ. ईश्वरराव भोसीकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, विठ्ठलराव माकणे, माधवराव पटणे, बालाजीराव पांडागळे, राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे तसेच सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
जगदगुरू भिमाशंकरलिंग महाराज पुढे म्हणाले, जन्माला येणाऱ्या सर्वांकरिता मृत्यू हा अटळ आहे. माधवराव पांडागळे समाजासाठी आधारस्तंभ नसून, शिराढोण येथील मठासाठी,धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचेही निर्माणकर्ते होते, असे सांगून माधवराव पांडागळे यांचे कार्य हे खरोखरच अत्यंत वाखाणण्यासारखे आहे, असे याप्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना जगदगुरू भिमाशंकरलिंग महाराज शिराढोणकरांनी आवर्जून सांगितले आहे.

प्रारंभी, डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव पांडागळे आदींच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुन विनम्रपणे अभिवादन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ता संतोष पांडागळे, दिगंबर पेटकर, डॉ. शंकरराव स्वामी वडेपुरीकर, विठ्ठलराव माकणे,अवधूतराव शिवणे व नांदेड जि.प.चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे आदी मान्यवर मंडळींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सभापती दिवंगत माधवराव पांडागळे यांच्या जीवन तसेच कार्यावर प्रकाश टाकला. त्याचवेळी, राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी निस्वार्थपणे जगणे हे कसे असते, याचे चित्र आम्ही माधवरावजी पांडागळे यांच्या कार्याच्या माध्यमातून पाहिले असल्याचे स्पष्टपणे नमूद करून समाजाकरिता शेवटपर्यंत वाहून घेतलेले ‘व्यक्तिमत्त्व’ म्हणजे माधवराव पांडागळे असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. याप्रसंगी शिवदासराव धर्मापुरीकर, व्यंकटराव मालीपाटील, बालाजी पाटील पांडागळे, बापूराव देशमुख, खुशालराव पाटील पांडागळे, नागोराव पाटील आलेगावकर, संतोष पांडागळे व माजी नगरसेविका डॉ. करूणाताई जमदाडे यांच्यासह शेख मोईन लाठकर, हरीभाऊ नाईकवाडे, रावसाहेब सावते, देवराव पांडागळे यांच्यासह शिराढोण, उस्माननगर, किवळा, बोरगाव, टेळकी तसेच गोपाळचावडी व परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते तथा भाविकांची आणि महिला व पुरूष चाहत्यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्यंकटराव मालीपाटील यांनी केले, तर खुशालराव पाटील पांडागळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.