माहूरच्या वानोळा जि.प.गटातून निवडणूक लढविण्याचा अभिजीत राठोड यांचा विजयादशमी दिनी संकल्प..

475

माहूर, नांदेड –

माहूर जि.प. पं.स.ची मुदत संपण्यास काही महिने शिल्लक असतांना तालुक्यातील वाई बा. व वानोळा जि.प. मतदार संघात राजकीय मोर्चेबांधणी सुरु झाली असून अनेक इच्छुकांनी जनसंपर्कासह नेतृत्वाशी सलगी वाढविण्यास प्रारंभ केला आहे. वानोळा जि.प. मतदारसंघाचे शिल्पकार व या भागाचे शिक्षण महर्षी स्व.दत्तराम राठोड यांचे पुतणे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सचिव अभिजित दशरथ राठोड यांनी विजयादशमीच्या सुमुहूर्तावर पक्षश्रेष्ठीने विश्वास टाकून वानोळा जि.प.गटाची उमेदवारी दिल्यास साम,दाम,दंड भेदासह नेटाने निवडणूक लढवून माझे मोठे बाबा स्व.दत्तराम राठोड यांच्या संकल्पनेतील विकास साधण्यासाठी वानोळा जि.प.गटातील अनेक महत्वपूर्ण प्रलंबित विकास कामे करण्याचा संकल्प रेणुकामातेच्या दर्शनानंतर केला आहे. अभिजित राठोड यांचे भाषा प्रभुत्व, वक्तृत्व कौशल्य व उच्चशिक्षितपणा ही बाब त्यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे वानोळा जि.प.गटात जनमाणसात चर्चा आहे.

माहूर तालुक्यातील मात्तब्बर राजकीय घराणे असलेल्या स्व.दत्तराम राठोड यांच्या मार्गदर्शनात घडलेले अभिजित राठोड यांनी वयाच्या २२ व्या वर्षी वानोळा ग्रा.प. मध्ये त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आ. प्रदीप नाईक यांचे तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व असतांना राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध पॅनल उभे करून संपूर्ण उमेदवार निवडून आणले त्यानंतर गावाचा विकास करण्याचा संकल्प असल्याने सत्ताधारी पक्षासोबत जाणे योग्य राहील हा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सहभागी होऊन आपल्या राजकीय परिपक्वतेचा परिचय करून दिला व वानोळा ग्रामपंचायत अंतर्गत अनेक विकासाची प्रलंबित कामे करवून घेतली. त्यामुळे त्यांना कधीही मागे वळून पाहण्याचे काम पडले नाही. ते सतत वानोळा ग्रा.प.च्या सभागृहात टिकून राहिले व आजही ग्रा.प.सभागृहात निर्णायक म्हणून सज्ज आहेत.

मोठे वडील स्व.दत्तराम राठोड यांच्या समाजसेवेचा वारसा जपत चुलतभाऊ कृष्णकुमार राठोड यांच्याशी समन्वय ठेऊन वानोळा परिसरातील सर्वात जुनी शिक्षण संस्था असलेल्या त्यांच्या वानोळा, आनमाळ येथील शाळेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. काही दिवसापूर्वी कृष्णकुमार राठोड यांचे नाव या जि.प. गटात भावी उमेदवार म्हणून चर्चेला आले होते. परंतु कृष्णकुमार राठोड यांनी माझ्या वडिलानंतर त्यांचे खरे राजकीय वारसदार माझे बंधू अभिजित राठोड हेच असल्याचे पुरातन काळातील राम,भरत बंधूप्रेम सम भावना व्यक्त केली. स्व. दत्तराम राठोड यांचे राजकीय धडे व जनसेवेचे संस्कार व आशीर्वाद या भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी असलेली तळमळ व अपूर्ण राहिलेले त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा उद्देश ठेऊन आगामी जि.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिल्यास संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविणार असल्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. गत महिनाभरापासून त्यांनी वानोळा जि.प. गटात जनसंपर्क वाढविला असल्याने त्यांना जनतेतून प्रतिसाद मिळत असल्याने यावेळी पक्षाने युवा कार्यकर्त्यांला संधी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.