माहूर नगरपंचायतची आरक्षण सोडत जाहीर होताच रणधुमाळीला सुरुवात ! राजकीय पक्षाकडे एकनिष्ठ कार्यकर्त्यासह अनेक नवख्यांच्याही येरझारा वाढल्या !

298
जयकुमार अडकीने
माहूर, नांदेड –
माहूर नगरपंचायतची वार्ड निहाय आरक्षण सोडत प्रशासनाच्या चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणामुळे दि.१२ नोव्हेबर २०२१ रोजी काढण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून दि.१५ रोजी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आल्यानंतर ओबीसी व सर्वसाधारणच्या जागेत काही अंशी बदल झाल्याने व निघालेली आरक्षण सोडत अंतिम झाल्याचे गृहीत धरून शहरातील विविध प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी राजकीय पक्षाचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली असून काही पक्षाला नवखे असलेले बहाद्दर आपण विधानसभा व जि.प. निवडणुकीत सुद्धा पक्षाला फायदेशीर ठरू शकतो असे मनघडण समीकरण बनवून राजकीय पक्षाच्या नेत्यांना व जबाबदार पदाधिकाऱ्यांना पटवून देण्यास सुरुवात करून उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागले आहे.
अपवाद वगळता काही राजकीय पक्ष सुद्धा जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेण्याऐवजी केवळ साम,दाम, दंड, भेद युक्त पक्षाशी काहीही देणेघेणे नसलेल्या नवख्या उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसत असून पक्षाची वर्षानुवर्षे इमानदारीने झील ओढणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्याऐवजी केवळ निवडून येणे व न.प. च्या सभागृहात आपल्या पक्षाचे स्थान गुणात्मक पेक्षा संख्यात्मकदृष्ट्या कसे वाढेल याच प्रयत्नात असल्याचे दिसून येत असल्याने वर्षानुवर्षे पक्षाशी एक निष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना “ हेची फळ काय मम तपाला” असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ येत आहे.
हल्लीच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका म्हणजे दुकानदारी बनली असून भांडवल गुंतवणे व शासकीय निधीच्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी वसूल करणे हा गोरखधंदा बनला असल्याने अनेक भांडवलदार या निवडणुकात रस घेत असल्याचे कटू सत्य असल्याने निवडणुका दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. यामध्ये काही अवैध मार्गाने संपती जमविलेले नव श्रीमंतांचाही समावेश आहे. अमूक एका राजकीय पक्षाने साम, दाम, दंड, भेद युक्त उमेदवार दिल्यास इतर राजकीय पक्षानाही त्याच तोलामोलाचा तगडा उमेदवार देणे क्रमप्राप्त होत असल्याने निवडणुका खर्चिक बनल्या असून पक्षनिष्ठा, प्रामाणिक -पणा व अभ्यासू वृत्ती, विकसनशीलतेची क्षमता या बाबी केवळ काल्पनिक बनल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना केवळ आपल्या राजकीय पक्षाचे उमदेवार निवडून आल्यास त्याचा जयघोष करणे व पराभूत झाल्यास त्याचे चिंतन करत बसणे याशिवाय कोणतेही काम उरले नाही. तेव्हा राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाची उमेदवारी देत असतांना या सर्व बाबीचा साधक बाधक विचार करून पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून त्याच्या कार्याचा सन्मान करणे आवश्यक आहे. अन्यथा आगामी काळात लोकशाही नष्ट होऊन “जिसकी लाठी उसकी भैस प्रवृत्ती” वाढीस लागून लोकशाही धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही हे कटू सत्य कुणीही नाकारू शकत नाही. तूर्तास एवढेच पुरे.

Leave A Reply

Your email address will not be published.