माहूर नगरपंचायत निवडणुकीची चाहूल; इच्छुकांची जनसंपर्क व पुर्वतयारीला सुरुवात..

1,428

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

नगरसेवक व्हायचे असेल तर कमाल 15 व किमान 5 लाख..!

नगराध्यक्षसाठी कमाल 1 कोटी तर किमान 50 लाखाची गरज..!

माहूर नगरपंचायतचा कार्यकाल डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण होत असून दोन महिन्यात नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक लागणार आहे.त्यामुळे विद्यमान नगरसेवकासह नवे जुने कार्यकर्ते निवडणूक लढवू इच्छित असलेल्या वार्डात जनसंपर्क वाढवीत असल्याचे दिसून येत आहेत. एरव्ही पाच वर्ष जनतेच्या सुख दुखःशी काहीही देणे घेणे नसलेली मंडळी आता आनंद सोहळा असो की, दुखःद घटना त्या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावत संबंधितांना सहानुभूती दाखवत त्या आडून निवडणुकीला आपण उभे ठाकणार असल्याचे संदेश देत आहेत.

हौस्या, नवस्या उमेदवारामध्ये काही समाजसेवेशी काहीही देणे घेणे नसलेली मंडळी आपण आपल्या स्वार्थासाठी करीत असलेले उद्योग व्यवसाय म्हणजे जणू काही समाजसेवाच असल्याचा आव आणत आपण खूपच मोठे समाजसेवक आहोत व २४ तास जनतेच्या सेवेत राहणाऱ्या जनमान्यता प्राप्त कार्यकर्त्यांसाठी गतीरोधक बनण्याचे मनसुबे बाळगून आहेत. आ.भीमराव केराम, माजी आ. प्रदीप नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण, नामदेवराव केशवे,ना.बच्चू कडू, राज ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर, असदोद्दीन ओवेसी यांच्या नावावर नगरसेवक होण्याचे मनसुबे इच्छुक बाळगून आहेत. तर काहीजण मागील ग्रा.प. काळात सुद्धा कधीही सदस्य न बनू शकलेलेही निवडणूक न लढविता पक्षाची सत्ता आणून रिमोट स्वतःकडे ठेवण्याचेही मनसुबेही बाळगून आहेत.

गत काही वर्षापासून नगरपंचायत निवडणुकीत मायाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने जर नगरसेवक व्हायचे असेल तर कमाल 15 लाख ते किमान 5 लाख आणि नगराध्यक्ष बनायचे असेल तर कमाल 1 कोटी ते 50 लाख रुपये नियोजनासाठी लागणार असल्याचा आणि तेही निवडणूक विभागाच्या डोळ्यात उमदेवार खर्च मर्यादा डावलून धूळ फेकण्यात यशस्वी होणे हा जणू अलिखित पायंडा पडला असल्याने अनेक सामान्यांना जनसेवेची कितीही तळमळ असली तरी धनशक्ती व निवडणूक विभागच्या डोळ्यात धूळ फेकण्याच्या कौशल्याच्या अभावामुळे सावध पवित्रा घ्यावा लागत असल्याने आगामी नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक धनशक्तीनेच होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

तर लाखो रुपये पाण्यासारखे उधळून सुद्धा अनेक जण अयशस्वी झाल्याच्याही घटना याच माहूर शहरात घडल्या असल्याने काही जन भाबडी आशा बाळगून आहेत.बिना अवाढव्य खर्चात समान्य कार्यकर्ता निवडून आल्याचा अपवादसुद्धा सापडत नाही. माहूर न.प. मध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस 8, शिवसेना 4, काँग्रेस 3, एमआयएम व भाजपा प्रत्येकी 1 असे बलाबल असून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सत्तास्थानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कु. शीतल जाधव नगराध्यक्ष व काँग्रेसच्या सौ.आश्विनी आनंद पाटील तुपदाळे उपनगराध्यक्ष आहेत.

गत निवडणुकीत अवघ्या एक मताने पराभूत झालेले आकाश कांबळे, आगामी निवडणूकित पुन्हा नशीब अजमावण्याच्या तयारीत आहेत. तर विद्यमान नगरसेवकापैकी प्राचार्य राजेंद्र केशवे, फिरोज दोसानी, आनंद पाटील तुपदाळे, प्राचार्य भगवानराव जोगदंड, मेघराज जाधव, इलियास बावानी, दीपक कांबळे, ज्ञानेश्वर लाड, विकास कपाटे निरधारी जाधव सौ.ज्योती कदम, रफिक सौदागर, रहेमत अली, राजकुमार भोपी, राजाराम गंदेवाड राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकृत नगरसेवक भाजपा शहराध्यक्ष गोपू उर्फ सागर महामुने, अजीसभाई व गतवेळेसचे पराभूत उमेदवार माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, किसन राठोड, विनोद पाटील सूर्यवंशी, निसार कुरेशी, आशिष चारभाई, अर्चना दराडे, प्रतिभा पाटील, सागर दुधे, पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

तर नवीन निवडणूक लढविण्यास इच्छुकामध्ये वेदांत जाधव, नंदकुमार जोशी विशाल शिंदे, राजु सौंदलकर, दीपक मुरादे, सिद्धार्थ तामगाडगे, अमृत जगताप, दत्ता बोबडे, सिराज रजा, अहेमद कुरेशी, पद्मा गीऱ्हे, कैलास फड, मीनाक्षी पाटील, आदिसह काही ज्ञात अज्ञात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, वंचित बहुजन आघाडी,प्रहार जनशक्ती पक्ष, एमआयएम, संभाजी ब्रिगेड, गोर सेना, माकप सह विविध पक्षातील अनेक जण निवडणूक लढविण्यास इच्छुक असून आपापल्या पक्षाच्या नेत्याची आतापासूनच उमेदवारीसाठी मनधरणी करतांना दिसत आहेत.

यावेळची निवडणूक बहुसदस्यीय वार्ड पद्धतीने होणार असल्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश असून किमान दोन सदस्यांचा एक प्रभाग करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला नुकत्याच दिल्या असून प्रभागरचना, आरक्षण सोडत नंतर आणखी काही कल्पना न केलेले चेहेरे समोर येण्याची शक्यता असून नगरसेवकाच्या १७ खुर्च्यासाठी किमान १७० तर नगराध्यक्ष पदाच्या एका खुर्ची वर डोळा ठेऊन बहुमताने निवडून आणण्यासाठी किमान पाच ते सहा जण मैदानात उतरण्याची शक्यता आहे. प्रभागरचना, आरक्षण सोडतनंतरच माहूर शहराच्या राजकारणात रंगत येणार असून आगामी महिनाभरात काय काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.