मोठी बातमी ! मराठवाड्यात ओमायक्रोनचा शिरकाव ; लातुरात आढळला पहिला रुग्ण

972
लातूर –
संपूर्ण जगामध्ये ओमायक्रोन या विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्र राज्यातही ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये ओमायक्रोनचे रुग्ण आढळून आले होते. मात्र आता मराठवाड्यातही ओमायक्रॉनने शिरकाव केल्याने सर्वांची झोप उडाली असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. मराठवाड्यातील लातूर मध्ये ओमायक्रोनचा रुग्ण आढळून आला आहे. हाय रिस्क देशातून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रोनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. आणि या तपासणीमध्ये हा व्यक्ती ओमायक्रोनबाधित आढळून आला आहे. मात्र यामध्ये लक्षणे अगदी सौम्य प्रकारची आहेत. सदर व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.
लातूर मध्ये ९४ नागरिक हे परदेशातून आले होते. त्यामधील या व्यक्तीला ओमायक्रोनची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर अधिकारी सतर्क झाले असून या ९४ जणांपैकी काहीजण शासनाने जाहीर केलेल्या अति जोखमीच्या देशातून आलेले आहेत. तर उर्वरित नागरिक हे कमी जोखमीच्या देशातून आलेले आहेत.या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामधून एक व्यक्ती पॉझिटीव्ह आला. या व्यक्तीचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रामध्ये पाठविण्यात आले होते. त्यामध्ये सोमवारी या व्यक्तीचा रिपोर्ट ओमायक्रोन बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीमध्ये लातूर मधील कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून संपूर्ण प्रकारची काळजी घेतली जात आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम युध्द पातळीवर प्रशासनाने सुरू केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.