येत्या दोन वर्षात सभागृहाचेही काम पूर्ण करू- आ.हंबर्डे यांचे आश्वासन.
नांदेड –
नांदेडच्या हडको परिसरातील संत कबीर नगर येथील त्रिरत्न बुध्दविहाराचे पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने आपल्या १० लाख रूपयांच्या विकास निधीमधून संरक्षक भिंत उभारण्यात आली असून, येत्या दोन वर्षात या विहाराच्या प्रागंणात सभागृह उभारण्याचेही काम पूर्ण करू, असे आश्वासन नांदेड दक्षिणचे लोकप्रिय तथा विकासप्रिय आ.मोहनराव हंबर्डे यांनी दिले आहे.
नवीन नांदेडातील हडको भागातील संत कबीरनगर येथील त्रिरत्न बुध्द विहाराची संरक्षक भिंत आ. मोहनराव हंबर्डे यांच्या १० लाख रूपयांच्या विकास निधीतून उभारण्यात आली. या बुद्ध विहाराच्या संरक्षक भिंतीचा लोकार्पण सोहळा ११ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई पावडे यांची उपस्थिती,तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्रीनिवास जाधव तसेच नगरसेविका गीतांजली हाटकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी संतोष पांडागळे,विनोद कांचनगिरे, उदय देशमुख,ॲड.प्रसेनजीत वाघमारे, शेख अस्लम, शेख मोईन, लाठकर, राजू लांडगे, माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे, सिध्दार्थ गायकवाड, माजी नगरसेविका तसेच वाघाळा शहर महिला ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा.ललिता शिंदे-बोकारे व माजी नगरसेविका डॉ.करूणाताई जमदाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीला आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. दरम्यान, प्रसिद्ध शाहीर बापुराव जमदाडे, गायीका नालंदा सांगवीकर तथा गंगासागर वाघमारे यांचा बुध्द-भीमगीतांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रमही संपन्न झाला आहे. यावेळी, महापौर जयश्रीताई पावडे यांनी, अध्यक्षीय समारोपात तथागत गौतम बुद्ध यांनी संपूर्ण विश्वाला शांततेचा व मानवतेचा संदेश दिला असल्याचे नमूद करून संपूर्ण जग हे तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करीत आहे, त्यामुळे आता आपणही मागे राहून चालणार नसल्याचे यावेळी उपस्थित बहुजन समाज बंधू-भगिनींना व कार्यकर्त्यांना आवर्जुन सांगितले.