नायगावच्या रातोळीत सरपंच, ग्रामसेवक कनिष्ठ अभियंत्यांनी मारली दांडी; चौकशी न करताच परतले विस्तार अधिकारी.

1,434

नायगाव, नांदेड –

रातोळी ग्रामपंचायतमधील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत झालेल्या अपहाराची चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकारी एस. आर. कांबळे हे शुक्रवारी गेले होते. मात्र कनिष्ठ अभियंत्यासह सरपंच, आजी आणि माजी ग्रामसेवक तर गायबच होते उलट चौकशीसाठी दप्तरही उपलब्ध करुन दिले नसल्याने चौकशी न करताच परतण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे.

रातोळी येथील सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समीतीमधील कनिष्ठ अभियंत्याच्या संगनमताने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत भ्रष्टाचाराचा श्रीगणेश केला असल्याची बाब उघड झाली आहे. आराखड्यात समाविष्ट नसलेली कामे दाखवून जवळपास २० लाखाच्या रकमेचा अपहार झाला असल्याने सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अंकूश पाटील यांनी (ता.१५) रोजी केली होती. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार झाल्याची नायगाव पंचायत समितीकडे पहिलीच तक्रार आली होती त्यामुळे गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी विस्तार अधिकारी एस.आर. कांबळे यांना चौकशी करण्यासाठी दि. २० सप्टेंबर रोजी आदेश काढले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

चौकशीच्या वेळी तत्कालीन ग्रामसेवक एस.जी. वडजे, कनिष्ठ अभियंता एम.ए.जीरवणकर, सरपंच व विद्यमान ग्रामसेवक एम.एम. बंडे यांनी चौकशीकामी मदत करण्याबरोबरच अभिलेखे उपलब्ध करुन देण्यात यावे अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल अशी तंबीही देण्यात आली होती. पण विस्तार अधिकारी कांबळे हे दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी रातोळी येथे गेले असता तिथे सरपंच, ग्रामसेवक व कनिष्ठ अभियंता उपस्थित नव्हते. ते उपस्थित नसले तरी त्यांनी चौकशीसाठी अभिलेखेही उपलब्ध करुन देण्यात आले नाहीत. त्यामुळे नायगाव पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यावर चौकशी न करताच परतण्याची नामुष्की ओढावली आहे.

चौकशी वेळी सर्वजण गैरहजर तर होतेच पण अभिलेखेही उपलब्ध करुन देण्यात आले नसल्याने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामात अपहार झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. रातोळी हे आ.राम पाटील रातोळीकर यांचे गाव असून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले होते व काही सदस्य बिनविरोध निवडूनही आले होते. सरपंच पदी आमदार गटाच्या सौ. सुमनबाई पिराजी देशमुख या असून त्यांच्यासह ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप होत आहेत त्यामुळे आ. रातोळीकर यांच्या भुमिकेकडे तेथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज शुक्रवारी रातोळी येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्याची गेलो होतो. पण तिथे कुणीही हजर नव्हते त्यामुळे चौकशी करता आली नाही सदर प्रकाराचा पंचनामा केला असून तसा अहवाल सादर करणार आहे.

एस. आर.कांबळे,

विस्तार अधिकारी, नायगाव.

 

Leave A Reply

Your email address will not be published.