लग्नाच्या वाढदिवशी जोपासले ‘रक्ताच्या नात्यापलीकडचे नाते’ !

राहुल रातोळीकर यांचे कार्य वाखणण्यासारखे.

667
नायगाव, नांदेड –
आपल्या जीवन प्रवासात रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ नाते आहे, याची जो जाण व भान ठेवतो त्याचे संपुर्ण जीवन मंगलमय बनते. त्यालाच आत्मसुखाची गोडी लागते. पद,धन-संपत्ती, ऐश्वर्य यापेक्षा सामाजिक दायित्वातून प्रतिष्ठेचा धनी होण्यात सुख मानणारा प्रशासकीय अधिकारी म्हणून राहूल पाटील रातोळीकर यांच्याकडे पाहता येईल. अगदी तरुण वयात प्रशासकीय सेवा बजावताना समाजाचे आपण काही देणे लागतो, या उदात्त हेतूने बृह्मन्मुंबई महापालिकेत वृक्ष अधिकारी पदावर असलेले नायगाव तालुक्यातील रातोळी  येथील रहिवाशी व आ.राम पाटील रातोळीकर यांचे पुत्र असलेले राहूल पाटील रातोळीकर यांनी लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील उपेक्षित, गोरगरीब आणि भिकार्‍यांना आवश्यक त्या गरजा पुरवून माणुसकी जोपासली.

वाढदिवस म्हटले की, अमाप खर्च, पैशांची उधळपट्टीच. प्रचंड उधळपट्टीच्या आडून आपल्या श्रीमंतीचा बडेजावपणा करण्याची जणू सध्या पद्धतच रुढ झाली आहे. परंतु राहूल पाटील रातोळीकर हे त्याला अपवाद ठरले. ते बृहन्मुंबई महापालिकेत वृक्ष अधिकारी असून 12 नोव्हेंबर हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. राहूल पाटील रातोळीकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पल्लवी यांनी कोणताही बडेजावपणा न करता लग्नाचा वाढदिवस समाजातील उपेक्षित, गोरगरीबांना मदत करून साजरा करण्याचा संकल्प केला. नेरली कुष्ठधाम येथील कुष्ठरोगींना अन्नदान, दैनंदिन उपयोगातील साहित्य, रस्त्यावरील भिकार्‍यांना ब्लँकेट, चादरी वाटप केल्या. या सर्वांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून आवश्यक त्या गरजा उपलब्ध करून दिल्या. 
लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना हे युवा दाम्पत्य ॥ दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ॥ जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात॥ या ज्ञानेश्वरांच्या ओळींप्रमाणे रंजल्या गांजल्यांचा, निराधारांचा आधार बनले हेच खरे. एवढेच नव्हे तर ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि’…. या विचारसरणीतून आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्नही या कार्यातून केला असेच म्हणता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.