लहान-मोठ्या पावसाच्या पुराने सतत पाण्याखाली येणाऱ्या पुलांच्या नव्याने उभारणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय. – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण.

534

नांदेड-

नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक रचना, गोदावरीसह इतर लहान-मोठ्या नद्या, नाले आणि ओढ्यांना पावसामुळे येणारे पूर यात मोठ्या प्रमाणात लहान पुलांचे, ठराविक ठिकाणी रस्त्याचे अतोनात नुकसान होते. याचबरोबर जीवितहानीही वारंवार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अतिवृष्टी झाली की सातत्याने यात होणारी हानी लक्षात घेता अशा जागेवर नव्याने पाण्याखाली न येणाऱ्या उंचीचे पूल उभारण्याबाबत गंभीरतेने विचार सुरू असून लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल,असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आढावा बैठक दि.8 सप्टेंबर रोजी रात्री उशीरा त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमरनाथ राजूरकर,आमदार मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

ग्रामीण व राज्य महामार्गावरील सर्वच पुलांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. जे पूल अथवा पुलाचा काही भाग ज्या ठिकाणी वाहून जातो, जे पूल जलमय होतात अशा पुलांची वर्गीकरण करुन त्यांना प्राधान्यक्रमानुसार दुरुस्त करणे व त्याबाबत पर्यायी नियोजना बाबतच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याचबरोबर पावसाळ्यामध्ये सातत्याने अपघात होणारी ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणी अपघात होऊ नये यासाठी क्रॅशबार अथवा इतर पर्याय आहेत का याची तपासणी करण्याचे त्यांनी निर्देश दिले.राष्ट्रीय महामार्गाची स्थिती ही अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यात औरंगाबाद ते नांदेड पर्यंत, नांदेड ते अहमदपूर-लातूर, नांदेड ते हदगाव, नांदेड ते देगलूर व पुढील मार्गावर मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची गरज आहे. याचाही सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना देऊन याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सन 2006 नंतर नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नदी-नाल्यांना पूर आल्याने मोठे नुकसान झाले आहे. यात बऱ्याच ठिकाणी शेतातील उडीद व इतर पिके हातची आलेली गेलेली आहेत. काही ठिकाणी शेतातील मातीही खरबडून गेली आहे. शेतकऱ्यांना यातून सावरण्यासाठी पिक विमा योजना व इतर स्तरावर मदत करण्यासाठी तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कृषि विभागाला दिले.
जिल्ह्यातील 7 तलावांना हानी पोहचली असून 2 तलाव फुटले आहेत. 5 तलावांची दुरुस्ती आवश्यक आहे. ही दुरुस्ती तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले. जिल्ह्यातील या अतिवृष्टीमुळे झालेल्या एकुण नुकसानीचा अंदाज घेऊन कामाचे प्राधान्यक्रम व यासाठी मदत व पूनर्वसन विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन विकास आराखड्याद्वारे नेमके कोणती कामे होऊ शकतील याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले.

नांदेड महानगरात जवळपास 400 घरांमध्ये पाणी शिरले असून यामुळे 580 लोकांना विस्थापीत केले असून त्यांची व्यवस्था मनपातर्फे केली जात आहे. विविध सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येत असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त सुनिल लहाने यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे छायाचित्रासह सादरीकरण केले. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी सादरीकरण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.