लोहा तालुक्यात ढगफुटी;पुराच्या पाण्यात बैलगाडी वाहून दोन सख्या जावांचा पुरात वाहून दुर्दैवी अंत.

2,444

लोहा, नांदेड-
लोहा तालुक्यातील सावरगाव (न), मस्की,बेरळी,देऊळगाव, हिप्परगा,चितळी,मुरंबी आदी माळाकोळी मंडळात ढगफुटी झाली. ढगफुटीत सावरगाव (न) येथील दोन सख्या जावा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

सोमवारी सकाळ पासूनच उसंत घेत पाऊस बरसत होता. दुपारी अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यात परिसरातील नदी नाले ओढे यांना प्रचंड पुर आला. सावरगाव येथील शेतकरी अमोल दगडगावे हे आपल्या शेतात दैनंदिनी प्रमाणे सहकुटुंब गेले होते.पाऊस जोरदार बरसत असल्याने त्यांनी बैलगाडीतून घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. घराकडे जात असताना ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यातील नदीला प्रचंड पूर आला परंतु आपण त्यातून जावू शकू असे वाटत असताना पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने बैलगाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यात बसलेले पाच जणापैकी अमोल दगडगावे त्याचा भाऊ विवेक दगडगावे, शिवमाला अमोल दगडगावे,आई मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, चुलती पार्वतीबाई संभाजी दगडगावे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, वय (52) व पार्वतीबाई संभाजी दगडगावे वय (45) ह्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तर अमोल दगडगावे, विवेक दगडगावे व शिवमाला दगडगावे हे नदीकाठी असलेल्या झाडाच्या फांदीला धरून जीव वाचविण्यात यशस्वी ठरले. मयत मनकर्णाबाई दगडगावे या हुलायवाडी येथील पुलाजवळ आढळून आल्या तर दुसऱ्या मयत पार्वतीबाई दगडगावे या पालम तालुक्यातील पेंडू येथील नदीत मृत अवस्थेत आढळून आल्या. मनकर्णाबाई व पार्वतीबाई या दोघी सख्या जावा होत्या. सदरील घटनेची माहिती मिळताच कंधार उपविभागाचे उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर, तहसीलदार राम बोरगावकर, माळाकोळी पोलीस ठाण्याचे सपोनी माणिकराव डोके, आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी लोहा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

मागील अनेक कालावधी पासून तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असताना सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून लक्ष देण्यात येत नसल्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. गत दोन वर्षांपूर्वी लोहा तालुक्यातील धानोरा (म) येथील कमी उंचीच्या पुलामुळे दोघांचा बळी गेला होता त्यानंतर कमी उंचीच्या पुलामुळे दुर्घटना घडून आणखी दोघांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती बळी घेणार? असा सवाल लोहा तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.