लोहा बसस्थानक बनले चोरट्यांचे माहेरघर; बसस्थानकातून प्रवाशाचे १ लाख रुपये घेऊन चोरटा पसार.

लोहा बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी.

521

लोहा, नांदेड –

शहरात मागील काही महिन्यांपासून शहर परिसरासह तसेच बसस्थानकात चोरीच्या घटनेत कमालीची वाढ झाली असून अद्याप पर्यंत पोलिसांना एकाही चोरीच्या घटनेचा तपास लागला नाही त्यामुळे शहरवासीयांत भीतीचे वातावरण पसरले आहे.स्थानिक पोलीस प्रशासन निव्वळ बघ्याची भूमिका बजावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

लोहा शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ वरील प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण असून शहरातील बसस्थानकात दैनंदिन हजारोंची वर्दळ असते. बसस्थानक सुरक्षेसाठी बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत तसेच सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे परंतु चोरटे सर्वांच्या नजरा चुकवत चोरीच्या घटनेला मूर्त स्वरूप देत असल्याचा प्रकार होत असलेल्या चोरीच्या घटनेवरून समोर आले आहे. कंधार शहरात सराफा दुकानात खाजगी नोकरी करणारे मधुकर माणिक पांचाळ रा.कंधार हे नांदेड येथील व्यापाऱ्यास एक लाखाची रोकड नेवून देण्यासाठी दि.२३ रोजी दुपारी कंधार येथून नांदेडकडे एस टी बसने जात होते. लोहा बसस्थानकात बस आली असता पांचाळ यांना लघुशंका आल्याने ते खाली उतरले दरम्यान बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या खिशातील १ लाख रुपये लांबविले. काही वेळाने पांचाळ यांना खिशातील एक लाखाची रोकड नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करत बस थांबवून पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली मात्र तोपर्यंत चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. सदर घटने प्रकरणी लोहा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तपास  सपोनि. शेख करत आहेत.

पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी चार महिन्यांपूर्वी लोहा पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळला तेंव्हा पासून मोटारसायकल चोरी,मोबाईल चोरी,घरात जबरी चोरी आदींच्या घटनेत प्रचंड वाढ झाली असून पोलीस केवळ बघ्याची भूमिका बजावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरातील नागरिक चोरीच्या घटनेने भयभीत झाले आहेत. अद्यापपर्यंत स्थानिक पोलीस प्रशासनाला चोरीच्या एकाही घटनेचा तपास लागला नाही, हे विशेष. बसस्थानक मधील सुरक्षारक्षक मात्र काय करत होते असा प्रश्न मात्र आता उदभवत आहे ?

▪️लोहा बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी.

लोहा बसस्थानकातील सीसी टी व्ही कॅमेरे केवळ देखावे ठरले असून सदरील कॅमेराच्या माध्यमातून एकाही चोरीच्या घटनेचा सुगावा लागला नाही. सदर कॅमेरे बदलून उच्च प्रतीचे कॅमेरे बसविण्यात यावे व बसस्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी बसवून चोरीच्या घटनेवर आळा बसविण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.