लोह्यात उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांची संयुक्त कारवाई; पेनूर, बेटसांगवी येथे १९ तराफे जाळले.
लोहा, नांदेड –
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीचा पूर ओसरताच वाळु माफियांनी पुन्हा आपले डोके वर काढले आहे. लोहा तालुक्यातील पेनूर-बेटसांगवी या भागात कायद्याच्या बडग्याला न जुमानता अहोरात्र वाळूचा चोरून उपसा सुरू आहे. एका महिन्यापूर्वीच पदभार स्वीकारलेले उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक व तहसीलदार व्यकटेश मुंडे यांच्या पथकाने या भागात धाडी टाकून १९ तराफे जाळून नष्ट केले.या कारवाईमुळे वाळूची अवैधरित्या चोरी करणाऱ्यांवर आता कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे.
नांदेडच्या लोहा तालुक्यातील पेनूर, बेटसांगवी, शेवडी, अंतेश्वर,भारसावडा, चित्रावाडी,मोहनपुरा या भागात उघडपणे गोदावरी नदी पात्रातून वाळू चोरी केली जाते. येथील वाळू तस्कर हप्ते बांधून पहाटेपर्यंत वाळूची अवैध वाहतूक करतात.लोह्याच्या चौकात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर पाळत ठेवून सतर्क राहण्याचा संदेश पाळतीवरील असणारे एकमेकांना देत असतात.सध्या वाळूच्या दरात वाढ झाली आहे.या तस्करांसाठी वाळूत पाणी मुरते, असते हे उघड सत्य व गुपित आहे.
सध्या नव्यानेच रुजू झालेले शिस्तप्रिय उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी वाळू माफियावर कडक कारवाईचे संकेत दिले असून पेनूर-बेटसांगवी येथे शनिवारी सुट्टीच्या दिवशी उपविभागीय अधिकारी मंडलिक व नव्याने रुजू झालेले तहसीलदार व्यंकटेश मुंडे तसेच नायब तहसीलदार राम बोरगावकर व त्यांच्या पथकाने या दोन्ही ठिकाणी धाडी टाकल्या. धाडीत १९ तराफे जाळून नष्ट करण्यात आले.उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे रुजू झाल्यानंतर ही पहिलीच मोठी वाळू चोरी विरुद्धची कारवाई ठरली आहे, महसूल कर्मचाऱ्यांसह इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे फिरते पथक वाळूची चोरी रोखण्यासाठी स्थापन केले जाणार आहे त्यामुळे लोह्याच्या चौकातील चोरट्या मार्गाने वाळू धंद्या करणाऱ्यांवर यंदा संक्रात येणार असल्याने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.