वाई बा.जि.प.गट काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी डॉ.निरंजन केशवे सज्ज.

काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन जबाबदारी दिल्यास संपूर्ण ताकदीने लढणार..

400

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

माहूर जि.प. पं.स.च्या सार्वत्रिक निवडणुकीची चाहुल लागल्याने विविध पक्षातर्फे इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून मतदारांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. वाई बा.जि.प. गटातही राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.वाई बा.जि.प. गट पूर्वी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. दरम्यानच्या काळात हा बालेकिल्ला काँग्रेसच्या हातून निसटला असून तो परत खेचून आणण्याचा निर्धार करून युवक काँग्रेसचे वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशवे यांनी विविध माध्यमातून वाई बा.जि.प. गटातील गावे, तांडे, वाड्या, गुड्यावर जनसंपर्क वाढविला आहे. वाई बा.जि.प.गटात काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन लढण्याची जबाबदारी दिल्यास वाई बा.जि.प. गट काँग्रेसकडे खेचून आणल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प डॉ.निरंजन केशवे यांनी व्यक्त केला आहे.

माहूर तालुक्यातील मोठे राजकीय प्रस्थ असलेले पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष विद्यमान संचालक काँग्रेसचे जेष्ठ नेते नामदेवराव केशवे यांचे पुतणे असलेले डॉ.निरंजन केशवे हे मितभाषी,अजातशत्रू व अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून संपूर्ण तालुकाभर सुपरिचित आहेत. नामदेवराव केशवे यांनी तब्बल १२ वर्षे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदावरून राजकारण करतांना जनसामन्यांचे सोडविलेले प्रश्न वडील बाबाराव केशवे यांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत ग्राम निर्माण करण्याकरीता करीत असलेले प्रबोधन व जनजागृती याचा बालवयापासूनच राजकीय वातावरणात असलेले डॉ.केशवे यांच्या मनात जनसेवेची असलेली तळमळ पाहून जिल्ह्याचे पालकमंत्री माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी डॉ.निरंजन केशवे यांना युवक काँग्रेसचे वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक पदावर नियुक्ती करून व्यापक जनसेवेची संधी उपलब्ध करून दिली.

माहूर येथे वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सेवा करीत असतांना तालुक्यातील नागरिकांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले. नुकताच डॉ.निरंजन केशवे यांचा वाढदिवस साजरा झाला त्या अनुषंगाने वाई बा.जि. प.गटातील अनेक गावे वाडी, तांडे, गुड्यामध्ये अनेक समर्थकांनी वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळे आयोजित करून त्यांना वाई बा. जि.प. गटातून काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला असल्याने वाई जि. प. गट आरक्षण सोडतीमध्ये खुला प्रवर्ग किंवा ओबीसी प्रवर्गासाठी सुटल्यास जि.प.गटात यापुढे केवळ विकासाचे राजकारण करण्यासाठी डॉ.केशवे यांनीच निवडणूक लढवावी असा सामान्य कार्यकर्त्याचा आग्रह होत असल्याने पालकमंत्री अशोकराव चव्हाण, जेष्ठ नेते नामदेवराव केशवे यांच्या मार्गदर्शनात सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने वाई बा.जि.प. गटातून काँग्रेस तर्फे निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढविण्यास सज्ज असल्याचे डॉ. निरंजन केशवे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.